Breaking News

सोमवार ठरला अपघात वार; 21 ठार, 33 गंभीर जखमी

पनवेल ः प्रतिनिधी

रायगड, नाशिक व बुलडाणा जिल्ह्यांत काल घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, 33 जण गंभीर, तर सुमारे 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या विविध अपघाताच्या घटनांमुळे रायगड, नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यांत कालचा सोमवार अपघात वार ठरला. या घटनांमुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापुरातील माडप गावच्या हद्दीत सावरोली खारपाडा मार्गावरील ओव्हर ब्रिजखाली भरधाव जाणार्‍या प्रिती ट्रॅव्हल्सने पुढे जाणार्‍या खासगी वाहतूक करणार्‍या मुरलीधर ट्रॅव्हलर्सच्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात मिनी बसचा चालक व त्याच्या शेजारी बसलेला पर्यटक असे दोन जण जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील

उपचारासाठी पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर किरकोळ जखमींवर खालापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापुरातील माडप गावच्या हद्दीत सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जोसेफ मनवेल सेरेजो (62) आणि चालक शेखर कांबळे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत, तर फलॉरी जोसेफ सेरेजो (50), अ‍ॅलिसन जोसेफ सेरेजो (30), आलफिया जोसेफ सेरेजो (23), नाबर्ट सेरेजो (60), अर्णेला सेरेजो (54), क्रिस्टल सेरेजो (22), सलाईन सेरेजो (17), मार्शल सेरेजो (72), फलॉरी परेरा (70), स्टॅनी परेरा (75), जॉयनेल सिल्वेरा (35), वंदना वर्तक (35), कृतांगी वर्तक (6), जयप्रकाश वर्तक (48), ब्रायन सिल्वेरा (50), प्रिती घोन्सालवीस (25), वैशाली डिमेलो (26), संजय डिमेला (28) हे जखमी झाले आहेत. याबाबत खालापूर पोलिसांनी मिनी बसचालक मयत कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसर्‍या घटनेत उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील नवे पोपुड येथे राहणारे भालचंद्र म्हात्रे (56) आपल्या रिक्षाने अलिबाग येथे जाताना खोपटा पुलाजवळ करंजा जंक्शन येथे रिक्षाचा अपघात होऊन त्यात तीन जण गंभीर जखमी व एक लहान मुलगी जागीच ठार आली.

भालचंद्र म्हात्रे रिक्षाने जाताना करंजा जंक्शनजवळ एक एनएमएमटी बस कोप्रोली ते जुईनगर मार्गावर जाताना हा अपघात घडला. भालचंद्र म्हात्रे व त्यांची पत्नी भावना म्हात्रे (50), मुलगी तेजश्री मंत्री (34) व त्यांची नात मुद्रा मंत्री (8) रिक्षातून प्रवास करताना भरधाव बसच्या धडकेने रिक्षातील भालचंद्र म्हात्रे, भावना म्हात्रे, तेजश्री मंत्री हे गंभीर जखमी झाले, तर मुद्रा मंत्री या मुलीचा जागीच मृत्यू झाला. भालचंद्र म्हात्रे, भावना म्हात्रे, तेजश्री मंत्री यांना उपचारार्थ नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उरण पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

साईदिघाटी गावाजवळ इर्टिगा व डम्परच्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू, तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चिरले गावातील जगदीश मढवी पेणकडे जाताना साई दिघाटी गावाजवळ समोरून आलेल्या डम्परला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. अपघातात सुरेखा मढवी (55) या महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर इर्टिगा गाडीची एअरबॅग फुटल्याने इतर जण वाचले असल्याचे समजते.

अन्य एका घटनेत नाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे भाविकांच्या कारला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. या अपघातात तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. एका मालवाहू ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे कारच्या मागे उभे असलेले गणेश ठाकूर, कुणाल ठाकूर, सागर ठाकूर आणि आशिष ठाकूर हे चारही जण जागीच ठार झाले.

कारमध्ये बसलेले ललीताबाई ठाकूर, अनिल ठाकूर, ध्रुप ठाकूर, रंजिता ठाकूर, माणिक ठाकूर आणि पल्लवी ठाकूर हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून इतर 10 ते 12 जणांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर जखमी भाविकांनी प्रचंड आक्रोश केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मलकापूर येथून अनुराबाद-झोडगा येथे प्रवासी घेऊन जाणार्‍या महिंद्रा गाडीला भरधाव ट्रकची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात गाडीतील 13 प्रवासी जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर असलेल्या रसोया कंपनीसमोर घडली.

या विचित्र अपघातात चालक अनिल ढगे (40), छाया खडसे (37), अशोक फिरके(55), नथ्थू चौधरी (45), आरती, रेखा, सोयीबाई शिवरकर (29), विरेन मिळवतकर (7), सतीश शिवरकर (3), मीनाबाई बिलोरकर, किसन बोराडे, प्रकाश भारंबे, मेघा भारंबे असे 13 जण जागीच ठार, तर गोकुळ भिलवसकर (30), छगन शिवरकर (26) आणि रोहित चौधरी हे तिघे जखमी झाले आहेत.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply