Breaking News

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्य सरकारने केलेला ठराव वर्ष उलटून गेले तरी केंद्र सरकारकडे पाठविला गेला नाही. तो केंद्राकडे पाठवून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी यावर विचारविनिमय करण्यासाठी आगरी व तत्सम समाजातील सर्व आजी माजी आमदारांची बैठक येत्या काही दिवसांत बोलावली जाईल. त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. त्यानंतर सर्व आमदारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविण्यात आले आहे.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची सभा शनिवारी जासई या ‘दिबां’च्या जन्मगावी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी अनेक वक्त्यांनी शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसचे संतोष केणे यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे, परंतु अजूनही काही होत नाही. येथे दुसर्‍या कुणाच्या नावाची चर्चा तर नाही ना? कम्युनिष्ट पक्षाचे कॉ. भूषण पाटील म्हणाले की, लढ्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. सरकारला जाग आणण्यासाठी आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कृती समितीशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी, असे पत्र त्यांना आम्ही दिले आहे. दुसर्‍या कुणाच्या नावाचा विचार झाल्यास तीव्र आंदोलन होईल, असेही ते म्हणाले. माजी खासदार संजीव नाईक यांनी, आमदार गणेश नाईक यांच्या कल्पनेनुसार या प्रश्नी सर्व आगरी आमदारांची लवकरच बैठक बोलावून त्यात विचारविनिमय करून मुख्यमंंत्री, उपमुख्यमंंत्र्यांशी भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावता येईल, असे सांगितले. त्यावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांनी लगेच आमदार गणेश नाईकांंशी फोनवर चर्चा करून सर्व आजी माजी आमदारांच्या बैठकीचा निर्णय घेण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, आंदोलन करण्यासाठी प्रथम वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. त्याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने जागृत राहून आपापल्या विभागात काम केले पाहिजे.
अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले की, सरकारला आपली ताकद दाखविण्यासाठी आंदोलन चालूच ठेवले पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळेल, पण त्या अगोदर चर्चा करून काही मार्ग निघतो का हे पहावे लागेल. या वेळी पंचमहाभूत भूमिपुत्र फाउंडेशनचे सुशांत पाटील, गणेश पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दशरथ भगत यांनी दि.बा.पाटील स्मृती कार्य स्पर्धेची माहिती देऊन या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्यासाठी त्याचा प्रचार व्हावा, अशी इच्छा प्रकट केली.
प्रारंभी राजेश गायकर यांनी प्रास्ताविकात कृती समितीची वाटचाल विशद केली. या सभेस ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, जे.एम.म्हात्रे, विनोद म्हात्रे, विजय गायकर, शैलेश घाग, मनोहर पाटील, सुरेश पाटील, सुनील कटेकर, रूपेश धुमाळ, किशोर घरत, दीपक पाटील, संतोष घरत, रघुनाथ पाटील, अनिल चिकणकर, आदित्य घरत, संजय घरत, पूजा कांबळे, योगिता म्हात्रे, वंदना घरत यांच्यासह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply