वाजे येथे भाजपतर्फे सायकल वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुलींना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती मदत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल. पैशावाचून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू देणार नाही अशी ग्वाही भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाजे येथे सायकल वाटपावेळी दिली.
दिवाळीच्या सणानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वाजे हायस्कूलमधील 32 मुलींना सायकलीचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 14) करण्यात आले, तसेच हा कार्यक्रम नेरे आणि रिटघरमध्येही आगामी काळात राबवण्यात येणार असेही त्यांनी सांगितले.
वाजे हायस्कूलमध्ये परीसरातील आदीवासी पाड्यांमधून अनेक मुली शिक्षणासाठी येतात. त्यांना हायस्कूलमध्ये येणे आणखी सुलभ व्हावे यासाठी दिवाळी सणानिमीत्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने मुलींसाठी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गाढेश्वर गावातील 10, देहरंग येथील आठ, वाजापूर येथील सहा, मनिकमाळ येथील तीन, धोदाणीमधील दोन, सांगटोली येथील दोन आणि वापदेववाडीतील एक अशा 32 विद्यार्थिनींना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, मालडूंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम पाटील, अध्यक्ष राजेश भोईर, वाजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री पाटील, भगवानशेठ पाटील, सदस्य पद्माकर वाघ, गणेश शिद, नारायण भगत, राम पाटील, माजी सरपंच बेबी भगत, ताई चंदर भस्मा, धर्मा आंबो, विष्णु पारधी, वनिता वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते राघो वाघ, वाजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील, माजी सरपंच राजेंद्र भालेकर, माजी सदस्य श्री भोईर, प्रतिभा कातकरी, गौरी कातकरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कारही केला.