Breaking News

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड व अंडरपास मंजूर

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून जाणार्‍या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूने 103.21 कोटी रुपयांचा सर्व्हिस रोड व अंडरपास केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. यामुळे या परिसरातील विकासाला अधिक चालना मिळणार असून याकामी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा कामी आला आहे.
नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग म्हणजेच दिल्ली मुबई कॉरिडॉर हा जेएनपीटीला तथा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पोहोचणार आहे. हा मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग बदलापूरनंतर पनवेल तालुक्यातील शिरवली, चिंध्रण गावाजवळून मोरबे सर्कलपर्यंत आलेला असून त्यापुढे तो महाराष्ट्र शासनाच्या विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरला जोडलेला आहे.
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई कॉरिडॉर पनवेल तालुक्यातील मौजे वांगणी तर्फे तळोजे, शिरवली, चिंचवली तर्फे तळोजे, आंबे तर्फे तळोजे व मोरबे इत्यादी गावातून जातो. या सर्व गावातील रहिवाशांना व विविध प्रकल्पांना दळणवळणाच्या दृष्टीने या द्रुतगती महामार्गाचा फायदा व्हावा, या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूने सर्व्हिसरोड व अंडरपास तसेच इतर विविध मागण्या केलेल्या होत्या. याबाबत 30 ऑगस्ट 2021 रोजी ना. नितीन गडकरी यांना पत्र देण्यात आले होते, तसेच आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. त्याचबरोबर या दोन्ही लोकप्रतिनिधींनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून 16 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फत अर्थात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नवी दिल्ली, (एनएमआय) ने मागणी मान्य केली आहे. त्यानुसार 4.018 किमी लांबीचा सर्विसरोड चेनेज 75+765पासून 79+783 पर्यंत मंजूर केलेला आहे.
याकामी अंदाजीत 103.21 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या सर्व्हिस रोडमुळे नैना व परिसराच्या विकासाला मोठया प्रमाणात चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक जनतेच्या वतीने आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्र शासन व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धन्यवाद देत आभार मानले आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply