Breaking News

दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधी वापरणार -सुधीर मुनगंटीवार ; गरज पडल्यास चारा-पाणी टंचाईसाठी आकस्मिक निधी खर्चणार

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यात 151 तालुके आणि 268 मंडळांमध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्रातील या दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधीचा वापर करून चारा छावण्या, पाण्याच्या टाक्यांसाठी या निधीतून खर्च करण्याचा शासकीय अध्यादेश आम्ही बुधवारी (दि. 22) काढत आहोत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या दुष्काळात लोकप्रतिनिधी चारा छावण्यांना भेट देऊन आढावा घेणार आहेत. 366 कोटी पाणीटंचाईसाठी, तर 400 कोटी रुपयांचा भरघोस निधी चारा टंचाईवर मात करण्यासाठी दिल्याची माहितीदेखील या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दुष्काळावर मात करण्यासाठी आठ हजार कोटींची तरतूद सरकारने केली आहे. गरज पडल्यास आकस्मिक निधी वापरून पाणीटंचाईचा नेटाने सामना करण्याचा सरकारचा निर्धार आहे. या वेळी त्यांनी रोजगार मागणार्‍यांना ताबडतोब रोजगार देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सीईओ यांना दिले आहेत. याकामी जे अधिकारी हयगय करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

दुष्काळ निवारणाच्या कामात सरकार आपली सर्व शक्ती पणाला लावणार आहे.  14 जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांना दोन ते तीन रुपये किलो दराने रेशन उपलब्ध करून देण्यासाठी साडेआठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा फायदा दिला जाईल. यासाठी आम्ही चार हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रक्रियेसाठी स्थानिक अधिकार्‍यांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

केवळ विधानसभेच्या तोंडावर नाही, तर गेल्या पाच वर्षांत सरकारने सतत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जमुक्तीनंतर काही तांत्रिक कारणांमुळे हजारो शेतकर्‍यांची अजूनही कर्जमाफी झाली नाही, असे निदर्शनास आले आहे. अशा सर्व शेतकर्‍यांसाठी सरकारने तालुका स्तरावर समित्या तयार केल्या होत्या. त्यांनी तयार केलेल्या याद्या आता राज्य सरकारकडे आल्या आहेत. या सर्व याद्यांना मंजुरी देत शेतकार्‍यांची कर्जमुक्ती करण्यात येणार आहे. भाजपच्या राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा सदरच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. दरम्यान, निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळेल असे वातावरण आहे, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply