Breaking News

शिवरायांची राजमुद्रा नौसैनिकांच्या गणवेशावर लावण्याचा निर्णय; रायगड भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त
नौसेना दिनानिमित्ताने सोमवारी सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आणि शिवरायांच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा दिला. गेल्या वर्षी मोदी सरकारने नौसेनेच्या झेंड्यावरून ब्रिटिशांच्या खुणा काढून महाराजांची छटा लावली होती. आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर शिवकालीन राजमुद्रा असणार आहे. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिमानाच्या आहेत. म्हणून उत्तर रायगड जिल्हा भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले.
या वेळी भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विनायक मुंबईकर, विश्वजित पाटील हेही उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पुढे बोलताना सांगितले की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेली सत्तर वर्षे आपल्या सशस्त्र सेनांचे दिवस दिल्लीतील एखाद्या लॉनवर साजरे होत असत. सत्तर वर्षांत प्रथमच एक पंतप्रधान आपला नौसेना दिन साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग येथे आले होते. मध्ययुगाच्या पूर्ण गुलामगिरीच्या इतिहासात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांनी आरमाराचे महत्त्व ओळखले. ज्याच्याकडे आरमार त्यांची समुद्रावर सत्ता, त्या राज्याचे समुद्रकिनारे बळकट आणि अंतिमतः जगाच्या व्यापाराचे दरवाजे त्या राज्यासाठी खुले होतात. असा सर्व विचार करून शिवरायांनी स्वतःचे आरमार उभे केले. त्या अर्थाने महाराज ते आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक ठरतात. या पार्श्वभूमीवर नौसेनेच्या ध्वजावर शिवरायांच्या मुद्रेवरून प्रेरणा घेऊन नवीन छटा साकारण्यात आली होती. आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असणार आहे.
गेली सत्तर वर्षे स्वतंत्र भारताची नौसेना गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या ध्वजाला वंदन करीत होती. मोदी सरकारने हे एक गुलामगिरीचे प्रतीक नष्ट करून देशवासीयांना आणि नौसेनेलाही अभिमान वाटेल असा हा बदल करून दाखवला. त्यामुळे आता ब्रिटिशधार्जिणी मुद्रा भारतीय सैनिक बाळगणार नाही.
आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिले सरकार आहे. आधुनिक भारताची नौसेना या महाराष्ट्राच्या कोकणाच्या भूमीत निर्माण झाली. कालच्या नौसेनेच्या प्रात्यक्षिकांमध्ये एका युद्धनौकेचे नेतृत्व महिलेच्या हातात देण्यात आले होते. मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी जितक्या गोष्टी केल्या आहेत तितक्या गेल्या सत्तर वर्षांत कोणी केल्या नसतील. नौसेनेमध्येसुद्धा नारीशक्तीला प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असेही अविनाश कोळी यांनी नमूद केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply