Breaking News

करंजाडेमध्ये विकासाची गंगा

सरपंच मंगेश शेलार यांचा पुढाकार; वर्षभरात 31 कामे

पनवेल ः प्रतिनिधी
नवीन वर्षात करंजाडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुमारे 400 सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर सेक्टर 6 ते 1 या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने नागरिकांना नवीन वर्षात चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचे गिफ्ट मिळणार आहेत. पाणी, वीज, आरोग्य सुविधा, गटारे, रस्ते यांसह विविध समस्या मार्गी लावून पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अवघ्या एक वर्षात विविध प्रकारची 31 विकासकामे मार्गी लावण्यात यश आल्याची माहिती करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांनी दिली.
करंजाडे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतीवर मागील वर्षी भाजपने शेकापची सत्ता उलथवून लावली आणि भाजपचे 11पैकी 10 सदस्य निवडून आले. सरपंच मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेल्या व प्रास्तावित विकासकामांची माहिती देण्यासाठी मंगळवारी (दि. 2) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सरपंच मंगेश शेलार बोलताना, आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. वर्षभरात प्रामुख्याने करंजाडे गावातील प्रवेशद्वार, रुग्णवाहिका सेवा, गणेश नगर ते टाटा पॉवर रस्त्याचे काँक्रिटीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सभामंडप, ग्रामपंचायत हद्दीत ओपन जिम, करंजाडेतील तलावातील गाळ काढणे, गणपती विसर्जन घाट बांधणे, करंजाडे गावात शौचालय बांधणे, शिवमंदिर येथे सार्वजनिक शौचालय बांधणे, सेक्टर 6करिता 150 एमएलटी पाणी पाईपलाईन जोडण्याचे काम, करंजाडे वसाहतीतील सोसायटीत तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, गणेश नगर अंतर्गत गटारे दुरूस्त करणे, गावदेवी आदिवासीवाडी येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, मुकरीची आदिवासीवाडी येथे शौचालय बांधणे, शिवमंदिर रस्त्याचे काँक्रिटीकरण यांसारखी विविध 31 विकासकामे मार्गी लावण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे, तर करंजाडेतील शिवमंदिर येथून पनवेल शहराला जोडणार्‍या पुलाच्या कामासाठी पाठपुरावादेखील सुरू असल्याची माहिती दिली.
करंजाडे ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, ग्रामसेवक देवकर, विभागीय अध्यक्ष कर्ण शेलार, भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, गणेश मोरे, संतोष विखारे, राज इंगळे, सागर कदम, गणेश प्रबळकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केक कापून आनंद साजरा केला. नवीन वर्षात आणि यापुढील चार वर्षात करंजाडेमधील सर्व नागरिकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी करंजाडे ग्रामपंचायत कटिबद्ध राहणार असल्याचा संकल्प करण्यात आला.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच भक्कम पाठबळामुळेच वर्षभरात विविध समस्या मार्गी लावण्यात यश आले. यासाठी सर्व सहकारी सदस्यांचेही चांगले सहकार्य लाभले. नवीन वर्षात करंजाडेतील नागरिकांना पाणी, उत्तम रस्ते, वीज आणि विविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासकामांचे चांगले गिफ्ट मिळेल.
-मंगेश शेलार, सरपंच,
करंजाडे ग्रामपंचायत

सेक्टर 5 व 6मध्ये रात्रभर जागून ही पाणी मिळत नव्हते. सिडको प्रशासन मोठमोठ्या सोसायट्यांना दोन-तीन दिवसांनी एखादा टँकर देत होते. तो पुरत नसल्याने टँकर विकत घ्यावा लागत होता. आता सेक्टर 6करिता नवीन कनेक्शन दिल्याने अनेक दिवसांची पाण्याची समस्या सुटली आहे.
-सलोनो सिंग, रहिवासी

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply