Breaking News

रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याची मागणी

कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवणार -मंत्री रवींद्र चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहचवणार आहे. तोपर्यंत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.8) येथे केले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघामधील भाजप बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा अलिबागमधील जयमाला गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी रायगड लोकसभा मतदासंघात भाजपने आपला उमेदवार द्यावा, अशी मागणी केली. हाच धागा पकडून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना भावना पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन या मेळाव्यात दिले.
मेळाव्याला भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील, सरचिटणीस अ‍ॅड.महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, दिलीप भोईर, जयवंत अंबाजी, अ‍ॅड.पल्लवी तुळपुळे, अलिबाग तालुकाध्यक्ष उदय काठे, शहराध्यक्ष अ‍ॅड.अंकित बंगेरा, जिल्हा चिटणीस परशुराम म्हात्रे, गिरीश तुळपुळे, खजिनदार हेमंत दांडेकर, माणिक बळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
2024 सालचा एप्रिल महिना महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. त्या दृष्टीने रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते व जनतेच्या मनात काय भावना आहेत त्या जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. येथे मी भाजप कार्यकर्ते व जनतेच्या मनात काय आहे ते जाणून घेतले आहे. अगदी विरोधकांच्या मनात काय आहे हेदेखील जाणून घेतले. तो मेसेज घेऊन मी वरिष्ठांकडे जात आहे. देश वेगळ्या दिशेने जात आहे. त्या दिशेने नेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार्‍या रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवार आपला पाहिजे, असे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.
रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत आहे. भाजप एक नंबरचा पक्ष बनला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळत असल्याने भाजपचा जनाधार वाढतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार व्हावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले.
माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की, पक्षाची ध्येयधोरणे जपणारा, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा लोकप्रतिनिधी असला पाहिजे. याबाबत पक्षाचे राज्यातील नेतृत्व नक्की विचार करेल.
भाजपच्या कमळ चिन्हावर रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी, अशी मागणी अ‍ॅड.महेश मोहिते यांनी केली. अ‍ॅड.अंकित बंगेरा, अ‍ॅड.पल्लवी तुळपुळे, किशोर पाटील यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले. संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलीप भोईर यांनी आभार मानले.
या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी निवडून आलेले सरपंच वैभव कांबळी (साळावचे), योगिता पाठारे (कोप्रोली) यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply