Breaking News

शिक्षण जीवनातील सर्वांत मोठे अंग -पद्मश्री दादा इदाते

स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षणाचे तत्त्व फार मोठे असून शिक्षण हे जीवनातील सर्वांत मोठे अंग आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिक्षणाचा पहिला आग्रह महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष व निती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री भिकूजी उर्फ दादा इदाते यांनी गुरुवारी (दि.29) केले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब व कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा 96वा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मैदानावर भव्य दिमाखात आणि समारंभपूर्वक पार पडला. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्काराने पद्मश्री भिकूजी उर्फ दादा इदाते यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संचालक शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, हरिश्चंद्र पाटील, प्रकाश भगत, अजय भगत, अनिल भगत, संजय पाटील, अतुल पाटील, माजी महापौर डॉ.कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भाऊशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्राचार्य एस. के.पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक हजारोंच्या संख्येने हजर होते.
पद्मश्री दादा इदाते यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की, जीवनात माणसे भेटतात तसे आपल्यात बदल होत असतो. कोणतेही काम करता करता आपला विचार आणि कृती विकसित होत असते, त्याच अनुषंगाने 24 तास देश, धर्म व संस्कृती यांचा आणि माणसातला माणूस शोधण्याचे काम रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. सामान्य माणूस आणि त्याचा विकास केंद्रबिंदू मानून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काम केले आहे. या वेळी पद्मश्री दादा इदाते आपल्या जीवनाचा प्रवास थोडक्यात वर्णन केला. महापुरुषांचे वचन जीवनाला प्रेरणा देतात. त्यामुळे प्रत्येकाने महापुरुषांच्या विचारांचा वचनाचा आदर्श अंगिकारला पाहिजे. जीवनात अनेक संकट येत जात असतात. त्यातून मीही गेलो आहे. घरी अठरा विश्व दारिद्य्र असल्यामुळे जिद्द होती, पण शिकणार कसे ही चिंता होती. जीवनात बदल घडविण्याचे काम आपल्या हाती असते हा विचार रूजवत भागवत सरांनी तू शिकलाच पाहिजे असा आग्रह केला. त्यांचा आग्रह मला जिद्द देऊन गेला. त्यामुळे मी पुढे वाटचाल करीत राहिलो. मी शाळेत आणि आई-वडील मुंबईला फुटपाथवर राहिले. मी ज्या तालुक्यात जन्मलो त्या ठिकाणी आमच्या सात वस्त्यांना भिकारवाडा असे नकाशावर नाव होते. मी ते श्रीमंतवाडा करायचे मनाशी खूणगाठ बांधली. शिक्षण, सामाजिक क्षेत्रात काम केले. प्रवास कष्टाने झाला, परंतु त्यात यशस्वी झालो. पद्मश्री आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले. देशव्यापी प्रवास केला. या सर्व जीवनप्रवासात आपले जीवन घडविण्याचे काम आपल्या हाती असते ही शिकवण मला मुळातच मंत्र देऊन गेली, अशा मोजक्या शब्दांत पद्मश्री दादा इदाते यांनी आपला प्रवास अधोरेखित केला.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माणसाला न्याय देण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पद्मश्री दादा इदाते हे व्यक्तिमत्वही तळागाळातील व्यक्तीसाठी झटणारे आहे. त्यामुळे स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आलेल्या या पुरस्काराने गुणीजनांचा आणि पर्यायाने समाजाचा सन्मान झाला आहे.
स्व. जनार्दन भगतसाहेबांनी केलेल्या कार्यामुळे या परिसराला वैभव प्राप्त झाले आहे. त्या काळी सरपंच, पंचायत समिती अशी पदे भूषवित असताना त्यांनी त्याचा कधीही बडेजाव केला नाही. उलट प्रत्येक जण आपला आहे असे मानून त्यांना मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याच धर्तीवर लोकनेते रामशेठ ठाकूर सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करीत असतात. सामाजिक जीवनात काम करीत असताना माणूस महत्त्वाचा असतो. त्यामुळे माणसासाठी माणूस जोडणारे व्यक्तिमत्व म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांचा परिवार आहे, असे गौरवोद्गार खासदार बारणे यांनी काढले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, कर्मवीर अण्णांकडून सुरू झालेली सेवा या भागात रूजवण्याचे काम जनार्दन भगतसाहेबांनी केले. त्यांच्या मार्गाने जात असताना समाजातील प्रत्येकाला न्याय मिळेल ही शिकवणच मूलमंत्र आहे. चांगले काम करणार्‍या व्यक्तीला गौरविणे हे आमच्या संस्थेचे काम आहे. समाजासाठी कष्ट घेणार्‍या व्यक्तीचा जेव्हा सन्मान होतो ती प्रेरणा असते आणि तिच प्रेरणा भावी पिढीला आदर्श ठरते. त्यामुळे अशा गुणीजनांचा सत्कार म्हणजेच समाजाचा सत्कार असतो. त्या अनुषंगाने मागीलवेळी राज्यातील कणखर नेते, थोर विचारवंत प्रा.डॉ. एन.डी. पाटीलसाहेबांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे रानावनात राहणार्‍या लोकांसाठी प्रचंड काम करणार्‍या पद्मश्री दादा इदाते यांना आज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे आमच्यासाठी एक प्रेरणा आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत हजारो हितचिंतक जोडले गेले आहेत आणि त्यामुळेच ही संस्था यशस्वी घोडदौड करू शकली आहे, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी म्हटले की, स्व. जनार्दन भगतसाहेबांची स्मृती मोठी आहे. त्यांचे कार्य सर्व समाजाला न्याय देणारे ठरले आहे. रयत शिक्षण संस्था मोठी संस्था आहे, त्याचप्रमाणे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था सर्व परीने मोठ्या प्रमाणात विकसित आहे. त्यामुळे मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सातत्याने येत असतो. चार वर्षांपूर्वी या पुरस्काराला सुरुवात झाली. पहिला पुरस्कार थोर विचारवंत एन.डी. पाटील सरांना प्रदान करण्यात आला. आज पुढील पुरस्कार तळागाळात प्रचंड काम करणार्‍या दादा इदातेंना प्रदान झाला याचा अत्यानंद आहे. भगतसाहेबांनी सर्व स्तरातील लोकांसाठी लढे दिले, हक्क मिळवून दिले. त्याचप्रमाणे त्यांचे जावई असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेला रामशेठ ठाकूर यांचा आधार असून ते ‘रयत’ला लाभलेली देणगी आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भगतसाहेबांचे कार्य आपले दीपस्तंभ मानून समाजातील मंडळींनी काम केले आहे. त्यांच्या नावाने उभारलेली संस्था लोकनेते रामशेठ ठाकूर व सहकार्‍यांच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करीत आहे. पद्मश्री दादा इदाते यांनी समाजातील तळागाळात शिक्षण पोहचवण्याचे काम केले आहे. संपूर्ण देशात आयोगाच्या माध्यमातून काम करून समाजाला प्रकाशझोतात आणण्याचे काम त्यांनी केले असून अनेक संस्था त्यांची प्रेरणा घेऊन काम करीत आहे. त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना आणि सहावेळा महासंसदरत्न असलेले खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करताना खूप आनंद होत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची संख्यात्मक नाही; तर दर्जात्मक आणि गुणात्मक वाढ करण्याचे काम होत आहे. संस्थेच्या या वाटचालीत हितचिंतकांचे आशीर्वाद यापुढेही राहतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी, कर्मयोगी माणसाच्या आठवणीत दुसर्‍या कर्मयोगी व्यक्तीला हा पुरस्कार असल्याचे उद्गार काढले. भगतसाहेबांना बघण्याचा योग्य मला आला नाही, पण वडील त्यांचा आवर्जून उल्लेख करायचे. पनवेल, उरणमधील संघर्ष जेव्हा येतो तेव्हा दि. बा. पाटील यांचे नाव येते. त्यामध्ये अग्रणी सहकारी म्हणून भगतसाहेबांच्या नावाचा उल्लेख आवर्जून येतो. भगतसाहेबांनी प्रत्येक माणसाला न्याय देण्याचे काम केले. पद्मश्री दादा इदाते यांनी केलेले काम देशपातळीवरचे असून त्यांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला बळ मिळाले. भगतसाहेब आणि दादा इदाते ही समाजासाठी काम करणारी व्यक्तिमत्वं आहेत. त्यामुळे पहिल्या पिढीचे कष्ट पुढील पिढीला मार्गदर्शक आहेत, असेही पाटील यांनी म्हटले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही आपल्या भाषणातून भगतसाहेबांच्या कार्याला उजाळा दिला. भगतसाहेबांचे जावई लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या सासर्‍यांच्या नावाने संस्था उभारून या संस्थेला यश मिळवून दिले असून सासर्‍यांच्या नावाने शिक्षण संस्था निर्माण करणारे हे एकमेव उदाहरण असेल, असे भावे यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोखाडा येथे अतिशय दुर्गम भागात रयत शिक्षण संस्थचे दर्जेदार विद्यालय उभारले आहे. तेही सर्वानी आवर्जून भेट देऊन पहावे, असे आवाहन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमी मला अशा कार्यक्रमाला आमंत्रित करीत असतात हे माझे भाग्य असून माझा नेहमी सन्मान करतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे असे सांगतानाच आजचा हा सोहळा समाजाची पूजा करण्यार्‍यांचा सन्मान आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख यांनी मानले. या वेळी रायगड जिल्ह्यातील पहिली कमर्शियल पायलट प्राप्ती ठाकूर यांचा तसेच संस्थेतील इतर गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply