सीमांकन व हस्तांतरण करून शेतकर्‍यांना योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या भूखंडांचे तातडीने सीमांकन व हस्तांतरण करून त्यांना नियमानुसार योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नैना प्रशासनाने सध्या मोठ्या प्रमाणावर नैना परिक्षेत्रात विकासकामांचे प्रयोजन केले असून त्या सर्व विकासकामांना सुरुवात तातडीने करावयाचे ठरले असल्याबाबत माहिती मिळत आहे. विकासकामे होणे हे अतिशय योग्यच आहे, परंतु तत्पूर्वी ज्या क्षेत्रात ही विकासकामे नैना प्राधिकरणाने प्रस्तावित केली आहेत त्या क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रांतील ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी नैना प्राधिकरणाने घेतल्या आहेत त्यांना नियमानुसार त्यांच्या वाट्यास येणार्‍या भूखंडांचे योग्य पद्धतीने वाटप होणे गरजेचे आहे. येथील अनेक शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या भूखंडाचे अद्याप सीमांकन, हस्तांतरण झालेले नाही. त्याबाबत शेतकर्‍यांनी वारंवार सांगूनसुद्धा प्रशासन या गोष्टी गांभीर्यान घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या जागेबाबत अनेक जणांच्या हरकती व नाराजी आहे. त्यांची योग्य प्रकारे दखल न घेताच नैना प्राधिकरणाने विकासकामे प्रस्तावित केली आहेत.
विकासकामे ही गरजेचीच आहेत, परंतु ती स्थानिक शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच झाली पाहिजेत, मात्र तसे न झाल्याने त्याबाबत स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे व या असंतोषाचा कधीही उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबींचा तातडीने विचार करून सर्वप्रथम शेतकर्‍यांच्या जमिनी, भूखंडाबाबत समस्यांचा त्वरित निपटारा करून नंतरच या विकासकामांची सुरुवात करावी, जेणेकरून शेतकर्‍यांचा असंतोष कमी होईल व योग्य प्रकारे कामे मार्गी लागतील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे; अन्यथा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकर्‍यांच्या बाजूने सिडको नैना प्रशासनाविरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply