अलिबाग : प्रतिनिधी
ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा मुख्यालयात असणार्या राखीव पोलिसांची ड्युटी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार लावली जाते. त्याप्रमाणे निरीक्षकांनी 20 फेब्रुवारीसाठी राखीव पोलिसांची ड्युटी लावली होती. यात हजेरी मास्टर मंगेश निगडे यांनी उपनिरीक्षक अश्विन जाधव यांना ड्युटी लावली असल्याचे कळविले.
जाधव यांना ड्युटीची कल्पना दिल्यानंतर हजेरी मास्टर मंगेश निगडे मंगळवारी ड्युटी लावलेल्या पोलिसांना सोडायचे का, हे विचारण्यासाठी रात्री 8 वाजता जिल्हा डीएसीबी शाखेकडे जाण्यास निघाले होते. हिराकोट तलावाजवळ निगडे व त्यांचा सहकारी आले असता, पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव यांनी त्यांना अडवून ड्युटी लावण्याबाबत विचारणा केली, तसेच निगडे यांच्या डोक्यात पिस्टलच्या बटने हल्ला करून जखमी केले. निगडे रक्तबंबाळ अवस्थेत कसेबसे तेथून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकार्यांना जाऊन भेटले व झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर निगडे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगेश निगडे यांनी आपल्यावर झालेल्या हल्याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात जबाब लिहून दिला आहे, मात्र अद्यापही याबाबत कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही.