लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून एकूण 30 लाखांची मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त
गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिन गुरुवारी (दि.1) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी प्रशासक महेश घबाडी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर यानंतर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.
या ग्रामसभेत गव्हाण गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तब्बल 25 लाख आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.
ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांवर चर्चा झाली. यात उलवे नोड प्लॉट क्रमांक 6, सेक्टर 12 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडांगणाचे सुशोभीकरण आणि विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. क्रीडांगणाची संरक्षण भिंत सिडकोच्या माध्यमातून बांधून घेण्यासाठी आवश्यक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यासोबतच सेक्टर 12, प्लॉट क्रमांक 7मधील बागेच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. गावातील पाणीपुरवठ्याच्या महत्त्वाच्या विषयावरही सविस्तर मंथन झाले. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिडको अधिकार्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.
या ग्रामसभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, अरुणशेठ भगत, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, भाऊशेठ पाटील, माजी सरपंच वसंत म्हात्रे, माजी उपसरपंच विजय घरत तसेच विश्वनाथ कोळी, वामन म्हात्रे, योगिता भगत, माई भोईर, जिज्ञासा कोळी, सचिन घरत यांच्यासह ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper