Breaking News

निमित्त, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’चे


आठवण मी शिवाजीराजे भोसले बोलतोयची

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महेश मांजरेकर यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची घोषणा ही गोष्ट आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियातून सर्वदूर पोहचली आहेच. महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा… गाठ माझ्याशी आहे. या शिवगर्जनेच्या सोबतीने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाचा उद्देश स्पष्ट होतो. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहता आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज ही महत्त्वपूर्ण भूमिका सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन, कथा लेखन असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध करत आहेत. चित्रपटाच्या आशयात नेमके कोणते सामाजिक वा राजकीय विषय हाताळले जाणार हे सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे, मात्र महाराष्ट्रच या सिनेमाच्या कथेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असणार आहे. आजच्या महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवर चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे, जे प्रश्न गेल्या काही दशकांपासूनही अनुत्तरितच आहेत.
सिद्धार्थ बोडके आपल्या भूमिकेविषयी बोलतो ही केवळ भूमिका नाही, तर एक जबाबदारी आहे. याआधी अनेकांनी महाराजांची भूमिका साकारली असून आता ती जबाबदारी माझ्यावर आहे. ती योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,
या निमित्ताने संतोष मांजरेकर दिग्दर्शित मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009) या चित्रपटावर एक फ्लॅशबॅक…आणखी काही मजकूर देतोय …’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’च्या दिग्दर्शनाच्या वेळी संतोष मांजरेकरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिरेखेतील महेश मांजरेकर यांच्या घोडेस्वारीचा अतिशय उत्तम रितीने सदुपयोग करायचा होता. चित्रपटाचे काही प्रमाणात चित्रीकरण झाल्यावर अंधेरी विलेपार्ले यांच्या दरम्यान एस.व्ही. रोडवर असलेल्या लता कुंज या बंगल्यात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यावर काही दृश्ये चित्रीत करायची ठरले. सकाळी साडेसहा वाजताची शिफ्ट ठरली. छत्रपती शिवाजी महाराज आणि रायबा हे घोड्यावरून दिनकर भोसले यांच्या घरी पहिल्यांदा पहाटे भेटायला येतात असे दृश्य चित्रीत करायचे होते. पहिल्या दिवशी पाऊस पडला म्हणून त्या दिवशीचे हे शूटिंग रद्द केले आणि दुसरा दिवस नक्की केला. पुन्हा सकाळी खूपच लवकर शूटिंग सुरू झाले. महेश मांजरेकरना घोडेस्वारी ज्ञात असल्याने त्यांना वेगळ्या सूचना द्यायच्या नव्हत्या. मकरंद अनासपुरे यांच्याऐवजी डमी वापरायचे ठरले. हे दोघे साधारणपणे चार पाच घरे ओलांडून दिनकर भोसले यांच्या इमारतीत शिरतात असे दृश्य घ्यायचे होते. त्यानुसार कॅमेरा आणि सगळे युनिट तयार होते. दिग्दर्शकाने स्टार्ट म्हणताच दोन्ही घोडे चालू लागले. महेश मांजरेकर यांनी लगाम चांगला पकडला होता आणि मागच्या डमीनेही भान ठेवले होते, पण लता कुंजवरचा कॅमेरा बघून घोडे बावचळले, महेश मांजरेकर यांनी लगाम खेचला आणि अशातच बंगल्यापूर्वीच्या इमारतीत घोडे शिरताच गोंधळ उडाला आणि त्यात ते दोन्ही घोडे पडले, महेश मांजरेकर यांचे डोके फूटपाथच्या कडेला आपटले आणि ते काही काळ बेशुद्ध झाले. त्यातच मागील घोड्याचा पाय महेश मांजरेकर यांच्या गालाला लागली. नेमके काय होतेय हे महेश मांजरेकर यांच्या लक्षात यायला वेळ लागला, पण तोपर्यंत दिग्दर्शकाने शूटिंगच रद्द केले. एकूणच गोंधळातून सावरताच महेश मांजरेकरने दिग्दर्शक संतोष मांजरेकरला सतत विचारले, तू शूटिंग का रद्द केले? सेटवरच्या या अपघातातून उभे राहून आपण शूटिंग करायला हवे. तोपर्यंत दिग्दर्शकाने दिनकर भोसले गच्चीतून पब्लिकशी बोलतोय हे दृश्य चित्रीत केले आणि त्यातील गर्दीचे शूटिंग दहिसरच्या एका बंगल्याबाहेर चित्रीत केले आणि मग त्या दोन्ही दृश्ये जोडून घेतली, पण महेश मांजरेकर यांनी या अपघातातून सावरत शूटिंग केले आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गेटअपमध्ये शिरताच महेश मांजरेकर यांना काही वेगळे तेज येत असे. एक नवीन उर्जा प्राप्त होत असे आणि ती या चित्रपटाच्या पत्थ्यावर पडली.
’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अगदी घोषणेपासूनच चर्चेत होता. प्रभादेवी येथील रवीन्द्र नाट्य मंदिर येथे या चित्रपटाचा झालेला भव्य मुहूर्तच सकारात्मक वातावरणात झाला. या वेळी राज्याचे तात्कालिक सांस्कृतिकमंत्री अशोक चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हे नाव महेश मांजरेकरनाच सुचले आणि संवाद लेखक संजय पवारनेही हेच नाव परफेक्ट असल्याचे म्हटले. दिनकर भोसले सचिन खेडेकरच साकारणार हे अगोदरच निश्चित झाले आणि या चित्रपटातील विविध व्यक्तिरेखा कोणाला द्यायच्या हेदेखील अगोदर निश्चित करीत तशी आखणी व कार्यवाही केली गेली. ’एखाद्या कलाकाराला घेऊन मग त्याला काढ’ असे या चित्रपटाबाबत अजिबात झाले नाही. मुहूर्तापासूनच एक प्रकारचे असलेले झपाटलेपण चित्रपटाच्या पत्थ्यावर निश्चित पडेल असाच विश्वास होता.
…आणि जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा, काही काही चित्रपट प्रेक्षक असे काही डोक्यात आणि अगदी डोक्यावर घेतात की ते चित्रपट पडद्यावरच राहत नाहीत तर ते समाजाचा एक महत्त्वाचा भाग बनतात. अश्वमी फिल्म्सचा संजय छाब्रिया निर्मित आणि संतोष मांजरेकर दिग्दर्शित ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपटही अगदी तस्साच. 2009 सालचा हा चित्रपट अगदी आजही तितकाच प्रभावी वाटतो यात बरेच काही आले. महेश मांजरेकर आणि अभिजित देशपांडे यांची अतिशय उत्तम बांधणी असलेली पटकथा आणि संजय पवार यांचे जोरदार संवाद तसेच सचिन खेडेकरने साकारलेली दिनकर भोसले ही व्यक्तिरेखा अशा अनेक घटकांतून हा चित्रपट विलक्षण प्रभावी ठरला. लता कुंज हा बंगला दिनकर भोसले यांचे घर म्हणून दाखवायचा हे त्याची मूळ रचना पाहून आणि त्यात आवश्यक तसे बदल करीत नक्की केले. दिनकर भोसले हा मुंबईतील चाळीत राहणारा अतिशय स्वाभिमानी आणि सरळमार्गी असा मध्यमवर्गीय मराठी माणूस. तो एकीकडे मुंबईवरील परप्रांतीयांच्या वाढत्या आक्रमण आणि त्यांच्या वृत्तीला कंटाळलाय. त्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनात याचे चटके बसताहेत. तर दुसरीकडे मराठी माणूस आपल्या स्वभावात बदल करीत नाही, तो आपल्या परंपराना चिकटून बसला आहे याचा त्याला राग आहे. अशा कोंडीत तो सापडला असतानाच छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या मदतीसाठी प्रगटतात आणि दिनकर भोसलेचा लढाऊ बाणा जागा होतो अशा मध्यवर्ती कथासूत्रावर हा चित्रपट रंगला. अतिशय रोखठोक, धारदार, जोरदार संवाद या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद ठरली. विशेष म्हणजे मुंबई असो, महाराष्ट्रात कुठेही असो, अगदी दुबई, लंडन, अमेरिका असे कुठेही असू देत या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगमनाच्या वेळी जय भवानी जय शिवाजी असा नारा घुमलाय. पब्लिक अगदी उसळून यायचा. या चित्रपटाची क्रेझ अशी विलक्षण रूजली. चित्रपटात हर हर महादेव आणि हे राजे जीर जीर जी या गाण्यांचा अतिशय उत्तम रितीने वापर केला असल्याने चित्रपट अधिकाधिक रंगतदार होत गेला. विशेष म्हणजे हे राजे जीर जीर या गाण्याचे पहिलं शूटिंग पूर्णपणे रद्द करुन पुन्हा एकदा नव्याने करायचे ठरले. खरंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट असो अथवा निर्मित असो, एकदा का पटकथा निश्चित झाली की त्यात कसलाही बदल करायचा नाही हे पहिल्या चित्रपटापासून आजपर्यंत चालत आले आहे. कधी रिशूटींग नाही, कधी पॅचअप नाही, पण या पोवाड्यासंदर्भात अपवाद ठरला. या पोवाड्याच्या शूटिंगवर त्या वेळी एक कोटी रुपये खर्च केले. महाबळेश्वर आणि काही भाग गोरेगावच्या दादासाहेब फाळके नगरीत शूटिंग करायचे ठरले आणि वाढत्या बजेटचा विचार न करता आपल्या चित्रपटाची थीम अधिकाधिक रंगतदार आणि प्रभावीपणे पडद्यावर यायला हवी असाच विचार केला आणि तो अमलातही आणला.
सचिन खेडेकरने टिपीकल पारंपरिक मध्यमवर्गीय मराठी माणूस उत्तम रितीने साकारलाय. मराठी माणसाचा अभिमान/स्वाभिमान/संकोच/कुचंबणा/त्रागा/लढाऊ वृत्ती असे अनेक घटक सचिन खेडेकरने उत्तम रितीने साकारले. या चित्रपटाच्या यशानंतर सचिन खेडेकरला अगदी याच पठडीतील तब्बल पस्तीस भूमिका ऑफर झाल्या, पण त्याने त्या नाकारल्या.
काही काही लोकप्रिय चित्रपट फक्त आणि फक्त पडद्यावर राहत नाहीत तर त्यांचा असा प्रभाव पडतो. पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या निमित्ताने असे थोडे मागे वळून पहायलाच हवे.

– दिलीप ठाकूर चित्रपट समीक्षक

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply