Breaking News

पनवेलमध्ये शुक्रवारपासून अभिनय प्रशिक्षण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. महानगपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 23 मे पासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
पनवेलमधील नाट्यकलावंतांना अभिनयासाठी आवश्यक असणार्‍या गुणांचा विकास होण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळावे याकरिता महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी महापालिकेमार्फत पुढाकार घेऊन आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेच्या सहकार्यातून सर्वांसाठी विनामूल्य असे हे अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.
23 मे ते 30 मे दरम्यान हे शिबिर होत आहे. 23 मे रोजी दुपारी 3 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या अभिनय शिबिराचे उद्घाटन होणार आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील नाट्य कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळावे व त्यांमधून पनवेलचे नाव राज्यात सर्वत्र पोहचावे याकरिता नाट्यपरिषद विविध उपक्रम सातत्याने राबवित असते.
पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन गटात हे अभिनय शिबिर घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला गट वय वर्षे 8 ते 16 व दुसरा गट 16 ते 60 वयांपर्यंत आहे. सकाळी 10 ते 1 व दुपारी 2 ते पाच अशा दोन टप्प्यात सात दिवस हे अभिनय शिबिर हेाणार आहे. शिबिरासाठी प्रत्येक गटामध्ये 30 /30 प्रशिक्षणार्थी आहेत. नाट्य, सिने क्षेत्रातील मान्यवर यामध्ये संजय हळदीकर (सोलापूर), रवी धुतडमल(एनएसडी दिल्ली),संकेत खेडकर (एनएसडी दिल्ली), अमोल भावे (ठाणे) आदी तसेच इतरही दिग्गज कलावंताचे मार्गदर्शन या शिबीरात होणार आहे. शेवटच्या दिवशी सर्व सहभागी शिबीरार्थींचे सादरीकरण होणार आहे. या अभिनय शिबिराचा समारोपप्रसंगी 30 मे ला मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. सर्व शिबिरांर्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पनवेलमधील नाट्यकलावंतांना अभिनयाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळावे याकरिता अशा प्रकारचे शिबिर घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेच्या सहकार्यातून हे अभिनय प्रशिक्षण आयोजित केले आहे. पनवेलमधील अभिनय प्रशिक्षणानंतर याच पध्दतीने खारघरमध्येही अभिनय प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
-परेश ठाकूर, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते

Check Also

उलवे परिसरात भाजप महायुतीची भव्य बाईक रॅली

उलवे नोड : रामप्रहर वृत्तजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. …

Leave a Reply