पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका नूतन मुख्यालयाच्या बांधकामाचा कामाचा दर्जा उत्तम असून कामाची प्रगती ही समाधानकारक आहे, तथापि नवीन मुख्यालयात नागरिकांच्या सोयी सुविधांचा अधिक विचार करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.18) येथे सांगितले.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल (प.) या भुखंडावर स्वराज्य-पनवेल महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, अजय बहिरा उपस्थित होते. शहर अभियंता संजय कटेकर यांनी मुख्यालयाच्या कामाची सविस्तर माहिती दिली.
या वेळी बोलताना आमदार म्हणाले, पालिकेच्या नवीन वास्तूचे काम प्रगतीपथावर असून पनवेलवासियांच्या सेवेसाठी लवकरच सुसज्ज अशी पालिकेची वास्तू निर्माण होणार आहे. यामुळे पनवेलच्या वैभवात देखील भर पडणार आहे.
महापालिकेत नागरिकांची रोजची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या दृष्टीने सार्वजनिक वाहतूकीचे थांबे, पार्किंगची सुविधा, स्वच्छतागृह, कॅफेटेरिया तसेच महासभा दालन, महापौर दालन, उपमहापौर दालन, स्थायी समिती दालन, सभागृह नेते दालन, विरोधीपक्ष नेता दालन व दोन कॉफरन्स हॉल , समिती बैठक कक्ष तसेच आयुक्त दालन या सर्वांची माहिती घेऊन सूचना दिल्या. बांधकामानंतरच्या पुढील कामाबद्दलही त्यांनी माहिती घेतली. तसेच सर्व कामे विहित वेळेत संपूर्ण दर्जा राखून पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका मुख्यालय स्वराज्य इमारत ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून पनवेलकडे येणार्या रस्त्यालगत उभारली जात आहे. या इमारतीचे काम जोमात सुरू असून भविष्यामध्ये पनवेल महानगरपालिका स्वराज्य मुख्यालय हे पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये लँडमार्क म्हणून भविष्यात ओळखले जाणार आहे.
या वेळी महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर,कनिष्ठ अभियंता प्रतिक आंग्रे, आकाश गायकवाड, कंत्राटदार धर्मेश पटेल, श्री. जाने आदी उपस्थित होते.
Check Also
सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी
तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …
RamPrahar – The Panvel Daily Paper