Breaking News

विकसित भारत घडविण्यात युवाशक्तीचा सिंहाचा वाटा असेल -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपला भारत 2047मध्ये विकसित देश म्हणून उदयास येणार आहे आणि यामध्ये युवाशक्तीचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ते खांदा कॉलनीत आयोजित विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमात बोलत होते.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) महाविद्यालयाच्या चर्चासत्र सभागृहात करण्यात आले.
देशाचे सेवाव्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन वर्षानिमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयामार्फत गुरदीत सिंग वोहरा आणि आशुतोष सिंग, रायगड जिल्ह्याचे युवा अधिकारी अमित पुंडे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा.टीपी. मोकल, क्षेत्र समन्वयक डॉ. दत्ता हिंगमिरे यांची उपस्थिती राहिली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी युवावर्गाशी मुक्त संवाद साधला. गुरदित सिंग यांनी युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047च्या संकल्पनेबाबत माहिती दिली, तर आशुतोष सिंग यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती देत युवकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या वेळी प्रत्येक सहभागी महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा मागोवा घेत विकसित भारत घडविण्याच्या प्रक्रियेत अथक परिश्रम घेऊन सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या एनएसएस कक्षाचे अध्यक्ष डॉ. राजेश येवले यांनी केले, तर सूत्रसंचालन एनएसएस विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील केले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनएसएसचे विभागीय संचालक अजय शिंदे, मुंबई विद्यापीठ एनएसएसचे संचालक सुशील शिंदे, कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर, जिल्हा समन्वयक प्रा. मोकल, क्षेत्र समन्वयक डॉ. हिंगमिरे यांचे विशेष सहकार्य लाभले, तर प्राचार्य डॉ. यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ. रमाकांत नवघरे, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे अध्यक्ष डॉ. शैलेश वाजेकर, एनएसएस विभागाचे अध्यक्ष डॉ. येवले, मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. आलोक भानुशाली, प्रा. सुशील घाडगे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री भोईर, एनएसएस विषय शिक्षक प्रा. रूपेश माने आणि स्वयंसेवक-स्वयंसेविका आदींनी परिश्रम घेतले.

Check Also

सामाजिक कार्यकर्ते गुलशन पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्याचे काम करते …

Leave a Reply