Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरणचा विकास -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

उरण : वार्ताहर
उरणमधील सर्व नागरिकांना माहीत आहे की, आपल्या हक्काचा माणूस आमदार महेश बालदी आहे. सर्वांना ते सहकार्य करतात. 15 वर्षांपूर्वीचे उरण आणि आताचे उरण आपण पाहतो तेव्हा येथील विकास हा त्यांच्याच नेतृत्वाखाली झाला आहे हे कुणीही नाकारू शकत नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. ते उरणमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
उरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप महायुतीची विजयी निर्धार सभा रविवारी (दि. 30) पालिकेच्या मराठी शाळा प्रांगणात झाली. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून योजना, निधीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी-शाह यांच्यासह भाजप महायुतीच्या सर्व नगरसेवकांना कमळ चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने निवडून द्या, असे आवाहन केले.
व्यासपीठावर भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, युवा नेते व माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदींसह प्रमुख पदाधिकारी, भाजप महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. या वेळी काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते तथा माजी उरण तालुका अध्यक्ष जे.डी. जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व इतर मान्यवरांनी स्वागत केले.
आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, मी असेन, आता जे.एम. म्हात्रे यांना आमदार महेश बालदी यांनी हक्काने कोणतीही गोष्ट सांगितली की कुणीही नाही म्हणत नाही. सर्वांचे ते आवडते आहेत. असे फार कमी लोकं असतात त्यांना सगळं मिळतं, पण ते स्वतःसाठी काही घेत नाही, तर उरणमधील जनतेसाठी रोज दिवसातून एखादा पूल मागतात, नाही तर रस्ता मागत असतात. काम मार्गी लागत नाही तोपर्यंत त्याचा ते पाठपुरावा करतात. उरणसाठी विकासात्मकदृष्ट्या जे जे आवश्यक आहे ते मिळवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली उरणचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करून येथील पालिकेत केंद्र व राज्यांच्या विचारांची सत्ता पुन्हा येणे आवश्यक आहे.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी आपल्या आक्रमक भाषणात विरोधकांचा समाचार घेत पोलखोल केली. त्याचप्रमाणे विकासाचा संपूर्ण पट मांडला. ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, सीमा घरत, नगराध्यपदाच्या उमेदवार शोभा-कोळी शाह आदींही विकासाचा वेध घेत उरणकरांना विजयाचे साकडे घातले.
या सभेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश बालदी यांना मोबाईलवर कॉल करून उरणकरांशी संवाद साधला आणि भाजप महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी तसेच नगरसेवकपदाच्या सर्व 21 उमेदवारांना आपला आशीर्वाद देऊन निवडून द्यावे, असे आवाहन केले. आमदार महेश बालदी यांनी सातत्याने विकासाची मालिका मांडली आहे. जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिर्वतन आणण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे त्यासाठी आम्हीदेखील त्यांच्या पाठिशी आहोत. नगरपालिका पुन्हा त्यांच्याकडे आली तर आपल्याला वेगाने काम करता येईल, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
सभेला भाजप राज्य परिषद सदस्य व नगरसेवकपदाचे उमेदवार रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, माजी नगराध्यक्ष तथा उमेदवार सायली म्हात्रे, उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, कामगार नेते सुधीर घरत, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, जासई विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, शहर शहराध्यक्ष संपूर्णा थळी, भाजप तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, मुकुंद गावंड, सरचिटणीस सुनील पाटील, संपर्क प्रमुख करण ठाकूर, रेय्यान तुंगेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply