Breaking News

महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -मंत्री शिवेंद्रराजे भोसले

कळंबोली ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेत भक्कम अशी महायुती झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे आपले तिन्ही नेते खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुती हा एकच पर्याय असून विरोधात कुणी काय बोलतोय, काय करतोय याकडे लक्ष न देता येथील परिसराच्या अविरत विकासासाठी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी येथे केले.
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा रविवारी (दि. 11) कळंबोली सेक्टर 3 मधील सुएसो जुनी शाळा येथे झाली. त्या वेळी मंत्री भोसले बोलत होते.
या सभेला महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, शिवसेनेचे तुकाराम सरक, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, गणेश कडू, भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, महायुतीचे प्रभाग क्रमांक 7मधील उमेदवार अमर पाटील, मनाली अमर ठाकूर, प्रमिला रविनाथ पाटील, राजेंद्रकुमार शर्मा; प्रभाग क्रमांक 8चे उमेदवार बबन मुकादम, रामदास शेवाळे, बायजा बबन बारगजे, सायली तुकाराम सरक; प्रभाग 9चे उमेदवार महादेव मधे, प्रतिभा सुभाष भोईर, दमयंती निलेश भोईर, शशिकांत शेळके; प्रभाग क्रमांक 10मधील उमेदवार रवींद्र भगत, सरस्वती नरेश काथारा, मोनिका प्रकाश महानवर, विजय खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, महायुतीच्या प्रचारासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. पनवेल महापालिकेत आमदार प्रशांत ठाकूर व सहकार्‍यांच्या माध्यमातून महायुती झाली. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! ज्या पद्धतीने तुम्ही एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने परिसराच्या विकासासाठी धडपड करणारे नेतृत्व तुमच्याकडे आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा त्यांना वारसा असून सर्वसामान्यांसाठी ते काम करतात. विविध कामे घेऊन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी सातत्याने माझ्याकडे येत असतात, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.
या वेळी मंत्री आदिती तटकरे आपल्या भाषणात म्हणाल्या की, सर्वप्रथम पनवेल महापालिका क्षेत्रातील नेतेमंडळींचे आभार व अभिनंदन, कारण येथे महायुती पहायला मिळते. 2016मध्ये स्थापन झालेल्या या महापालिकेचे महत्त्व आगळेवेगळे आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत विकास काय असतो हे दाखवणारी ही महापालिका आहे. येत्या काळातसुद्धा स्थानिकांचे प्रश्न सोडविणे, अधिकाधिक विकास करणे; त्याचबरोबर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळातून रोजगार निर्माण करणारी ही मनपा असणार आहे. कोविड काळात सर्वात लवकर व मोठे सेंटर सिडकोच्या माध्यमातून पनवेल महापालिकेत तयार झाले. अद्ययावत सुविधा या निमित्ताने देऊ शकलो याचे समाधान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा येथील विमानतळाचे उद्घाटन केले तेव्हा त्यांनी लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांना सर्वप्रथम अभिवादन केले. विरोधकांकडे विरोध आणि टीका करणे या पलिकडे काही नाही, परंतु तीन लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त विकासकामे केली जाणार आहेत. आपल्या उमेदवारांची ओळख नगरसेवक-नगरसेविका नाही, तर लोकसेवक-लोकसेविका म्हणून असेल, असे मंत्री तटकरे यांनी म्हटले.
कुणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. महिलांना सशक्त करण्यासाठी आमदार प्रशांतदादांमुळेही कामे झाली. पुढील कालावधीत येथे बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज वाटप करून रोजगार निर्मितीसाठी काम करणार आहोत. त्याचप्रमाणे अधिकाधिक पिंक रिक्षा पनवेलमध्ये धावतील आणि त्यातून माता-भगिनींना रोजगार मिळेल, असे अभिवचनही ना. तटकरे यांनी दिले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबई-पुणे महामार्गावर साकारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंकला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्यावे यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचे सांगून कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या भवनसाठी पाच कोटी रुपयांचा निधी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपलब्ध करून दिला, मी नगरविकास खात्यामधून एक कोटी मिळवून दिले. विरोधकांकडे व्हिजन नाही. त्यांनी ठोस काम केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पहायचे नाही. महायुतीला विजयी करायचे, असे आवाहन केले.
प्रशांतदादा येथील आमचे लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही ठाकूर चित्रपटात पाहिले होते. प्रत्यक्षात पाहिले नव्हते, पण लोकनेते रामशेठ ठाकूर व तुम्हाला पाहिले. तुम्ही गोरगरीबांसाठी काम करता, सर्वसामान्यांचे दुःख जाणता व त्यांना मदत करता, असे म्हणत त्यांच्या कार्याचे आमदार पडळकर यांनी कौतुक केेले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, विकासाच्या प्रवाहात कळंबोली वेगाने चालत आहे. येत्या 15 तारखेला तुमच्या सर्वांचा कौल महायुतीला असणार आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. खोटानाटा प्रचार करायचा, आरोप करायचे असे उद्योग ते करीत आहेत. म्हणे 65 टक्के टॅक्स माफ करणार. एवढे दिवस त्यांना जनतेला केवळ वेगवेगळ्या भ्रमात ठेवले, पण जनता सुज्ञ असून वेळोवेळी तुमचे बहाणे त्यांनी पाहिलेले आहेत. तुमच्या भूलथापांना जनता फसणार नाही.
टॅक्समाफी कुणाला नकोय, पण टॅक्समाफी करतोय सांगायचे आणि जनतेला फसवायचे, सत्तेच्या विरोधात उभे करायचे, सुखसोयींपासून वंचित ठेवायचे, व्याज दंडाचा त्यांच्या माथ्यावर मारायचे काम विरोधकांनी केले. याउलट आम्ही 35 टक्के सवलत मिळवून दिली. परिसराच्या विकासासाठी भाजप महायुतीने काम केले, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठामपणे म्हटले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply