‘मविआ’कडून जाणीवपूर्वक राजकारण : देवेंद्र फडणवीस
महाड ः प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्रालासुद्धा मदत मिळणार असल्याचे नुकतेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे, मात्र याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असा आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 20) सकाळी महाड येथे माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधले आहे.
फडणवीस म्हणाले की, या चक्रीवादळाचा लॅण्डफॉल गुजरातमध्ये झाला. 45 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात गावे उद्ध्वस्त झाली. म्हणून काल पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी गेले. त्यांनी पाहणी करून त्या ठिकाणी मदत घोषित केली. त्या मदतीची जी प्रेस नोट आहे त्यातच उल्लेख केलेला आहे की अन्य राज्यांनादेखील यामध्ये मदत मिळणार आहे.
या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दोन केंद्रशासित प्रदेश इतक्या राज्यांमध्ये नुकसान झाले आहे. कालची घोषणा झाल्यानंतर इतर कुठल्याही राज्याने त्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण त्या सगळ्यांनी ते वाचलेले आहे की केंद्र सरकार सगळ्या राज्यांना मदत करणार आहे. आता यामध्ये केरळ किंवा तामिळनाडू ही तर भाजपची राज्ये नाहीत किंवा आपण दुसरा विचार केला तर गोवा व कर्नाटक ही भाजपची राज्ये आहेत, तरीदेखील काल घोषणा गुजरातची झाली आहे.
या सगळ्या राज्यांना मदत मिळणार आहे. एवढेच नाही तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एसडीआरएफ हा राज्याकडे असतो. केंद्र सरकार एनडीआरएफमधील एसडीआरएफमध्ये पैसे अगाऊ देते. ते आपल्याला मिळालेले आहेत आणि एसडीआरएफमधून अशा प्रकारच्या कुठल्याही वादळात किंवा घटनेत राज्य सरकारने मदत करायची असते आणि पुन्हा ते जे पैसे राज्य सरकारने वापरले ते केंद्र सरकार परत करत असते किंवा नव्याने देत असते. केंद्र सरकारचेच ते पैसे असतात. हे सगळे राज्याला माहिती आहे. असे असतानाही यावर जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असा घणाघात या वेळी फडणवीस यांनी केला.
याचबरोबर कालच राज्याने दोन कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्याचे जाहीर केले. या लसी कुठून आल्या? जमिनीतून उगवल्या का, असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
कोकणाला देतेवेळी सेनेचा हात आखडता
कोकणाने शिवसेनेला भरपूर दिले. निसर्ग तसेच तौक्ते वादळात लोकांचे मोठे नुकसान झाले. आता शिवसेनेची देण्याची वेळ आलीय, मात्र हात आखडता घेऊन केंद्राकडे बोट दाखविले जात आहे. राजकारणात जेवढे प्रेम दाखविले जाते, तेवढे प्रेम आपत्ती काळातही कोकणावर सेनेने दाखवावे. काही आमदार 500-600 कोटी एका मतदारसंघात घेऊन चाललेत. त्याच वेळी वादळग्रस्त जिल्ह्यांना 150 व 200 कोटी देऊन बोळवण केली जाते.सरकारने वादळग्रस्तांना योग्य मदत केली पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची कानउघाडणी केली. ‘तौक्ते’चा जिल्ह्याच्या किनारपट्टीला मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रत्नागिरी दौर्यावरही आले होते.