पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकण पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक शाळेची गरज ओळखून त्या ठिकाणी विकास निधीतून आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम आमदार निरंजन डावखरे सातत्याने करत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी येथे मंगळवारी (दि.२४) केले.
आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर तालुक्यातील १८ शाळांना संगणक, प्रिंटर आणि प्रोजेक्टर यांसारख्या डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपच्या पनवेल येथील तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात हा डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला.
यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी नीलिमा डावखरे आणि पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्या हस्ते संबंधित शाळांच्या प्रतिनिधींना साहित्याचे हस्तांतरण करण्यात आले. उपस्थित शिक्षकांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना नीलिमा डावखरे यांनी आवाहन केले की, परिसरातील शाळांनी शैक्षणिक साहित्याच्या मागण्या आमच्यापर्यंत पोहवाव्यात, ते साहित्य उपलब्ध देऊ तसेच काही सूचना असल्यास त्याही जरूर कळवाव्यात.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे.
Check Also
आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …
RamPrahar – The Panvel Daily Paper