लंडन : वृत्तसंस्था
ठराविक मॅचच्या एक दिवस आधी झोप यायची नाही, हे सचिन तेंडुलकरने अनेक वेळा सांगितलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचआधी बरेच वेळा असं झाल्याचं सचिन म्हणाला होता. पण पाकिस्तानच्या बाबतीतही अशीच घटना घडली होती. त्या दिवशी पाकिस्तान टीमचा एकही खेळाडू भीतीमुळे झोपला नव्हता.
2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपवेळी ही घटना घडली होती. त्या रात्री पाकिस्तानच्या टीममधला प्रत्येक खेळाडू घाबरला होता. कोणालाही झोप येत नव्हती. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने त्या रात्रीबद्दल आपलं आत्मचरित्र ‘गेमचेंजर’मध्ये भाष्य केलं आहे.
‘20 वर्षांच्या कारकिर्दीमधली ती रात्र टीमसाठी सगळ्यात कठीण होती. आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो. आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या रुम मिळाल्या होत्या, पण कोणालाच एकट्याला झोपायचं नव्हतं, कारण आम्ही घाबरलो होतो,’ असं आफ्रिदी त्याच्या आत्मचरित्रात म्हणाला. 2007 सालच्या त्या दिवशी वर्ल्ड कपदरम्यान आयर्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. वूल्मर यांना विष देऊन मारण्यात आलं. सट्टेबाजीमुळे वूल्मर यांची हत्या झाली. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचा यामध्ये हात आहे, असे अनेक आरोप त्यावेळी झाले होते.
‘बॉब वूल्मर यांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही आमच्या रूममध्ये एकटे राहिलो नव्हतो. दोन-तीन खेळाडू एकत्र राहत होतो. कोणाला भीती वाटू नये आणि सगळ्यांना सुरक्षित वाटावं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कर्णधार इंजमाम उल हकनेही तेव्हा मुश्ताक अहमदसोबत रूम शेअर केली होती. मुश्ताक अहमद तेव्हा कोचिंग स्टाफचा सदस्य होता,’ असं शाहिद आफ्रिदीने सांगितलं. ‘तेव्हा मजबूत आणि सक्षम असलेल्या इंजमामलाही एकट्याला राहायला भीती वाटत होती. कर्णधार म्हणून मी इंजमामला एवढ्या कठीण परिस्थितीमधून जाताना पाहिलं नाही,’ असं वक्तव्य आफ्रिदीने केलं. 17 मार्च 2007 च्या त्या दिवशी पाकिस्तानचा आयर्लंडविरुद्ध पराभव झाला. यानंतर 17 आणि 18 तारखेच्या रात्री बॉब वूल्मर त्यांच्या हॉटेलच्या रूममध्ये मृत अवस्थेत आढळले होते.