पनवेल : बातमीदार
शरीरसंबंधास नकार दिल्याने चिंध्रण येथील एका महिलेला पाण्यात जबरदस्तीने ढकलुन तिची हत्या करण्यात आली असल्याची घटना खिडूकपाडा येथे घडली असून आरोपींविरोधात कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी राम भोईर (वय 38) याला पोलिसांनी अटक केली आहे.खिडुकपाडा येथे 24 मे रोजी वालदेश्वर मंदिराच्याजवळील मोकळ्या मैदानामध्ये दिव्याकडून पनवेलकडे जाणार्या रेल्वे पटरीजवळ असलेल्या तलावामध्ये एक अनोळखी बेवारस महिलेचा तलावाच्या पाण्यामध्ये पोलिसांना मृतदेह आढळून आला होता. अधिक तपास केला असता या मृत महिलेचे नाव सुवर्णा नामदेव कदम (चिंध्रण) असे असल्याची माहिती मिळाली. तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता सुवर्णा ही रात्रीच्या वेळेस मोकळे मैदानात, रेल्वे पटरीजवळ असलेल्या तलावाकडे जाणे शक्यच नसल्यामुळे ती पाण्यात बुडून मेली नसून तिला पाण्यात बुडवून तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यानुसार पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली व गुप्त बातमीदारामार्फत राम भोईर (खिडुकपाडा) व सुवर्णा कदम यांचे अनैतिक संबंध असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी राम भोईर याचा शोध घेऊन त्याच्याकडे अकस्मात मुत्यूच्या अनुषंगाने चौकशी केली असता सुवर्णा व त्याचे अनैतिक संबंध असल्याची कबुली दिली व 24 मे रोजी त्याने सुवर्णा हिच्याकडे अनैतिक शरीरसबंधांची मागणी केली असता तिने त्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग आल्याने राम व सुवर्णा यांच्यात बाचाबाची व झटापट झाली व राम भोईर याने सुवर्णा हिला जबरदस्तीने तलावाच्या पाण्यात ढकलून दिले. या वेळी सुवर्णाचे कपडे तलावाच्या काठावरच राहिलेले असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सुवर्णा कदम हिचे कपडे पाण्यात फेकून दिले. आरोपी राम भोईर यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper