Breaking News

खारघर-बेलापूर सागरी मार्ग साकारणार

सिडको करणार निर्मिती

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

नवी मुंबईतील नागरिकांना प्रवासाच्या उत्तम सोयी-सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी सिडको महामंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला खारघर-बेलापूर सागरी मार्ग यातीलच पुढचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अंदाजे 272.64 कोटी रुपये खर्च करून हा 9.5 किमी लांबीचा सागरी मार्ग विकसित करण्यात येत आहे.

सागरी मार्गाचा पहिला भाग खारघर सेक्टर 16 ते सीबीडी बेलापूर, सेक्टर 11 पर्यंत विकसित करणे प्रस्तावित आहे; तर दुसरा भाग सीबीडी बेलापूर सेक्टर 15 ते नेरूळ येथील जलवाहतूक टर्मिनलपर्यंत विकसित केला जाणार आहे. या सागरी मार्गाचा प्रथम भाग 5 किमीचा असून, या भागात सायन-पनवेल महामार्गावर पूलदेखील बांधण्यात येणार आहे. रस्ता व पुलाची रुंंदी 30 मी. असणार आहे. उर्वरित रस्ता 4.50 किमीचा असून, त्यातील 1874.00 मी. रस्त्याचा विकास दुसर्‍या भागात करण्यात येणार आहे. दुसर्‍या भागातील 1874.00 मी.चा रस्ता वगळता उर्वरित रस्त्याचा विकास यापूर्वीच करण्यात आलेला आहे.

खारघर, कामोठे, नवीन पनवेल, उलवे व द्रोणागिरी या नोड्समधील विविध प्रकल्पांचा विकास सिडकोमार्फत करण्यात येत आहे. यातील खारघरमध्ये सिडकोतर्फे अनेक गृहनिर्माण योजना, कॉर्पोरेट पार्क, मेट्रो यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सिडकोने सेंट्रल पार्क व गोल्फ कोर्ससारखे आयकॉनिक प्रकल्प साकारले आहेत. अशा परिपूर्ण खारघर नोडमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश मार्ग व कोपरा गाव असे केवळ दोनच एन्ट्री पॉईंट्स आहेत, परंतु या ठिकाणीदेखील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे अत्यावश्यक होते.

सिडकोच्या संचालक मंडळाच्या 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत सागरी मार्गाचा विकास करण्यासाठीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, या सागरी मार्गाच्या विकासासाठी लवकरच निविदा प्रक्रियादेखील सुरू करण्यात येणार आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply