Breaking News

खासदार झालो तरी पाय जमिनीवरच ः श्रीरंग बारणे

खोपोली ः प्रतिनिधी

पंचवीस वर्षे सामाजिक काम करीत असताना नगरसेवक ते खासदार झालो, मात्र या कालावधीत माझ्यात कुठलाही बदल झाला नाही, मी काल होतो आजही तसाच असणार आहे आणि आता पुन्हा खासदार झाल्याने माझ्यावरची जबाबदारी खूपच वाढली आहे. मावळ मतदार संघातील प्रश्नांची मला जाण आहे. मग ते पेण अर्बन बँकेचे प्रश्न असो वा येथील रेल्वेच्या समस्या, त्याबाबत निश्चित संसदेत आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, अशी निःसंदिग्ध ग्वाही  खासदार श्रीरंग बारणे यांनी खोपोली येथे केले.

मावळ लोकसभा मतदार संघावर पुन्हा बारणे खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतफे जाहीर सत्काराचा कार्यक्रम शाहू महाराज सभागृहात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना बारणे यांनी आपल्या मनातील भावना प्रकट केल्या.

  याप्रसंगी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर, उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, श्रीकांत पुरी, सुनील पाटील, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, तुकाराम साबळे, अश्विनीताई पाटील, वसंत भोईर, बापू घारे, पंढरीनाथ राऊत, सनी यादव तसेच दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, यांसह अनेक  मान्यवर उपस्थित होते, निवडणूक अर्ज भरल्यापासून कार्यकर्त्यांच्या मनात भीती होती की पवार घराण्यासमोर कसा निभाव लागणार पण मला शेवटपर्यंत खात्री होती की मी

चांगल्या मतांनी निवडून येणार, कारण माझा मावळच्या मतदारांवर विश्वास होता. मी पाच वर्षात त्यांच्याशी संपर्क ठेवला आणि म्हणून जनतेने मला निवडून दिले असे श्रीरंग बारणे यांनी सांगितले. माझ्या शिवसैनिकांनी 100 टक्के काम केले पण त्याहूनहि भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचे या माध्यमातून जाहीर आभार व्यक्त करीत आहे,

  माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या निवडणूक कालावधीत जीव तोडून काम केले व त्याबद्दल बारणे यांनी ठाकूर पिता-पुत्रांचे तोंड भरून कौतुक केले. आपल्याला पुन्हा काम करण्याची संधी दिली, याबद्दल त्यांनी पक्षप्रमुख उद्धवजींचे आभार मानले.

प्रशांतदादा ठाकूर यांनी महायुतीचे उमेदवार बारणे यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही प्रसार माध्यमांनी केला त्यात शासकीय अधिकारी सामील झाल्याचा त्यांनी आरोप केला. पण जनतेने विकासाला मत देण्याचे ठरविले होते व बारणे यांनीही निवडून येण्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला होता त्यामुळे या  निवडणुकीत खर्‍या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला. मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त करीत बारणे याना पुन्हा संधी दिल्याचे  त्यांनी सांगितले.  नवनवीन उद्योग येत आहेत त्यासंबंधी प्रशिक्षण घेऊन तरुणांनी रोजगारांच्या संधी शोधाव्या तसेच केंद्र शासनाच्या गडकरी साहेबांच्या खात्यामार्फत लघुउद्योगांना चालना देण्याविषयी धोरण आहे. त्याचाही लाभ घेता येईल. खातेदारांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे. त्यासंबंधी खासदारांनी केंद्र शासनाच्या निगडित खात्यात लक्ष घालून समस्या सोडवाव्यात नाहीतर विरोधातील मंडळी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून शासनाला अडचणीत आणतील, अशीही भीती ठाकूर यांनी व्यक्त केली. बारणे यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे त्यामुळे दांडग्या जनसंपर्कामुळे ते खासदारकीची हॅटट्ीक करतील, असे टाळ्यांच्या गजरात ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विचार मांडताना खासदार बारणे यांच्या संसदेतील कामाची स्तुती केली. समोर भ्रष्टाचाराचा भस्मासूर असतानाही केवळ केलेल्या कामाच्या जोरावर बारणे हे विजयी झाले असे त्यांनी नमूद केले.  यानंतर शहर भारतीय जनता पार्टीतफे प्रशांतदादा ठाकूर यांनी खासदार बारणे यांचा जाहीर सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेच्या पदाधिकार्‍यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन रवींद्र घोडके यांनी केले. 

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply