Breaking News

शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी

शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता पनवेल, उरणमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मेळावा पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वेळी शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर ठेवून सर्वपक्षीय एकवटले आहेत, अशी माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 21) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आगरी समाज हॉलमध्ये झालेल्या या परिषदेस कामगार नेते महेंद्र घरत, जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील, अर्थतज्ज्ञ जे. डी. तांडेल, काँग्रेसचे युवा नेते सुदाम पाटील, नगरसेवक रवींद्र भगत आदी उपस्थित होते.

या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, स्वर्गीय दि. बा. पाटील यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करून समाजाला दिशा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक आंदोलने यशस्वी झाली. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी सरकारला निर्णय घेण्यासही भाग पडले. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राजकीय पादुका बाजूला ठेवून आम्ही सर्वपक्षीय एकत्रित आलो आहोत. त्या अनुषंगाने 25 जणांची कोअर कमिटी स्थापन करण्यात येणार असून या मेळाव्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पनवेल, उरण परिरसरात विविध प्रकल्प साकारले आणि नव्यानेही प्रकल्प येत आहेत. त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित आणि नव्याने निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी समिती काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करीत होतो. त्यांच्या आशीर्वादाने ती घडी पुन्हा बसविण्याचे काम होणार असून सत्तेत असो वा नसो शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने ठामपणे कायम उभे राहू, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असले तरी त्यांनी आपण प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आहोत, ही ठाम भूमिका मांडल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

 या मेळाव्यात शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे विचार ऐकून प्रश्न मार्गी लावण्याची दिशा ठरवण्यात येणार आहे. सुरुवातीला चर्चेने प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जातील, मात्र न्याय न मिळाल्यास आंदोलनही उभारण्याची भूमिका लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केली. दि. बा. पाटील यांच्या आशीर्वादाने आपल्याला मोठी ताकद मिळाली. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वपक्षीय एकवटलो आहोत, असे सांगून या मेळाव्यात पनवेल, उरणमधील सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी मेळाव्यासंदर्भात माहिती देताना या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, खासदार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कामगार नेते भूषण पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply