Breaking News

प्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देणे हीच दि.बां.ना खरी आदरांजली

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची स्मृतिदिनी भावना

पनवेल ः प्रतिनिधी

आपले नेते दि. बा. पाटील साहेब योध्दा बनून प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. त्यांच्या आशीर्वादाने प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी सक्रियतेने काम करून दि. बां.चेे स्वप्न साकार करू या, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. 24) येथे केले.

शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये आदरांजली कार्यक्रम तसेच पनवेल, उरणमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दि. बा. पाटील यांना आदरांजली वाहताना लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.

 ते पुढे म्हणाले की, लोकनेते दि.बा. पाटील यांनी आपले आयुष्य लोकांच्या सेवेसाठी खर्च केले. सतत ते प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लढले, त्यांचे काम पुढे नेण्याच्या दृष्टीने कमिटी स्थापन करण्यात आली आहे, त्या अनुषंगाने 25 जणांची सर्वपक्षीय कोअर कमिटी स्थापन झाली असून त्याला अनुसरून किमान 105 जणांची सहकमिटी गठीत करण्यात येणार आहे.  प्रकल्पग्रस्तांचे काम माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. मुख्य कोअर कमिटीचा अध्यक्ष ही नुसती निवड नाही तर मोठी जबाबदारी मी समजतो. नुसती भाषणे करून चालणार नाही तर कमिटीत असल्याची जाणीव ठेवून सर्वांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे, असे सांगतानाच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टिकोनातून दिबांच्या स्मृतीचे स्मरण करून एकजीव होऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवू, असेही ते म्हणाले.

  यावेळी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य जवळून पहायला मिळाले आणि त्यांच्या चळवळीत सहभाग घ्यायला मिळाले, त्याबद्दल ऋणनिर्देश केले. प्रकल्पग्रस्तांच्या जागरासाठी दि. बां.साहेबांचे कुटुंब वाटचालीत कायम सहभागी राहिल्याचा उल्लेख करून त्यांच्याप्रतीही आदर व्यक्त केला. कामगार नेते महेंद्र घरत व पाटील साहेबांचे चिरंजीव अतुल पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय नेत्यांना एकसंघ केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला. दि. बां. चा महाराष्ट्राला मिळालेला वारसा आपल्याला चालविण्याचे काम करायचे आहे. प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व तळमळीने सरसावलो आहोत. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे हित अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून हि सुरुवात आहे. कमिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने त्यानुसार प्रत्येक आस्थापनेबरोबर चर्चा करून प्रश्न हाताळले जाणार आहे. 2015 पर्यंतची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला, दुर्देवाने काही संघटना न्यायालयात गेल्या व त्या निर्णयाला स्थगिती आली. अशाप्रकारे असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या सोयीने कायदा करावा, असे सांगतानाच माझ्याकडे असलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त हक्क मिळवून देणार असल्याचा उल्लेख करून ’हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही जाऊन द्यायचे नसते’ आणि ’चर्चेची दारे बंद ठेवायची नाही’ या दि. बां.साहेबांच्या दोन मूलमंत्रानुसार प्रकल्पग्रस्तांना न्यायिक हक्क मिळेपर्यंत लढत राहू, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, आमदार मनोहर भोईर, जेष्ठ नेते दशरथ पाटील, कामगारनेते महेंद्र घरत, भूषण पाटील, पांडुशेठ घरत, आमदार बाळाराम पाटील, जे. डी. तांडेल, सुधाकर पाटील, संतोष पवार, श्रुती म्हात्रे, सुरेश ठाकूर, रवी पाटील, विजय गडगे आदींनी मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, दिबांचे चिरंजीव अभय पाटील, अतुल पाटील, चेतन साळवी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,  जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, शैक्षणिक, सामाजिक, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply