पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश
पेणमधील मूर्तिकारांना दिलासा
पेण : प्रतिनिधी
गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून, गणेशमूर्ती घडविणार्या कारखानदारांचे काम जोरात सुरू आहे. ते लक्षात घेऊन पेण शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित करू नका, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विद्युत पुरवठा अधिकारी पाटील यांना दिले.
या बैठकीला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी पेणमधील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विद्युतविषयक अन्य प्रश्नांवरदेखील चर्चा झाली. शासनाकडून बे्रकडाऊनची कामे तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी अधिकार्यांना दिले. इंजिनिअर व वायरमनच्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात, तसेच ट्रान्सफार्मर, फिडर, वायर रिपेअरिंग करण्याचेही सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे गणेश मूर्तिकारांना सहकार्य करण्यासही सांगितले.