45 वर्षांत प्रथमच इतके पाणी


कर्जत : बातमीदार
नेरळ-कळंब रस्त्यावर उल्हास नदीवर असलेल्या दहिवली-मालेगाव या पुलाची शनिवार (दि. 27)च्या पावसाने बिकट स्थिती केली आहे. या पुलावरून सलग 33 तास पाणी गेले आहे. मागील 45 वर्षात प्रथमच एवढे तास पुलावरून पाणी गेले आहे, त्यामुळे पुलावरील डांबर वाहून गेले असून, नव्याने अधिक उंचीचा पूल बांधण्याची मागणी स्थानिक करू लागले आहेत. दरम्यान, या पुलामुळे असलेला संपर्क लक्षात घेता तत्काळ पुलाची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. उल्हास नदीवर दहिवली-मालेगाव येथील पुलाची निर्मिती 1974 मध्ये करण्यात आली, मात्र कमी उंचीच्या या पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात किमान चार ते पाच वेळ पुराचे पाणी जात असते. आठ-दहा तासापेक्षा जास्त वेळ पुलावरून पाणी वाहून जात नव्हते. पुलाची निर्मिती झाल्यापासून सलग 24 तास एकदाही पुलावरून पाणी गेले नव्हते. या वर्षी 26 जुलैच्या रात्री 9 वाजल्यापासून पुराचे पाणी पुलावरून जाण्यास सुरुवात झाली होती. 27 जुलै रोजी तर पुलावरून तब्बल 6-7 फूट पाणी वाहून जात होते. सतत 33 तास महापुराचे पाणी पुलावरून गेल्याने पुलावरील सर्व डांबर उखडून गेले आहे. परिणामी पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले असून, पूल खिळखिळा झाला आहे. पूरस्थिती निवळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दहिवली-मालेगाव पुलाची पाहणी केली. तत्काळ पुलाची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या ठिकाणी अधिक उंचीचा नवा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी रामचंद भवारे यांनी केली आहे.
पुलावरील कचरा काढला तरुणांनी


कर्जत : बातमीदार
नेरळ-कळंब रस्त्यावरील दहिवली पुलावरून मागील दोन दिवसात तब्बल 33 तास पाणी जात होते. त्या वेळी पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरा आणि झाडे येऊन अडकली होती. ती सर्व झाडे बाजूला करण्याचे काम या भागातील तरुण वर्गाने रविवारी (दि. 28) केले. सर्वत्र तरुणाई रविवारची सुटी एन्जॉय करीत असताना ते तरुण कचरा काढून टाकत होते आणि पुलाचे कठडे पुन्हा सुस्थितीत आणत होते. दरम्यान, त्या तरुणांच्या सामाजिक बांधिलकीचे पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांनीदेखील कौतुक केले. उल्हास नदीवरील दहिवली-मालेगाव पुलाला अडकून पडलेला कचरा काढून टाकण्याचे काम मानिवली, दहिवली, कोदिवले येथील तरुणांनी केले. त्यात किशोर गवळी, अतुल डायरे, ग्रामपंचायत सदस्य संकेत पाटील, जयदीप पाटील, बंटी पाटील, अमित नाईक, रत्नदीप पाटील, पवन डायरे व त्यांच्या सहकार्यांनी केले. या सर्व तरुणांचे कौतुक केले जात आहे.