Breaking News

भारताचा पुन्हा ‘सुपर’ विजय

वेलिंग्टन : वृत्तसंस्था
गेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये जबरदस्त विजय मिळवणार्‍या टीम इंडियाने शुक्रवारी (दि. 31) पुन्हा एकदा असाच विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथा विजय साजरा केला आहे. तिसर्‍या टी-20प्रमाणे या सामन्यातही रोमांच पाहायला मिळाला. गेल्या सामन्यात हिरो ठरले होते ते रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी. या सामन्यात हिरो ठरले ते लोकेश राहुल आणि शार्दूल ठाकूर.
सुपर ओव्हरमध्ये या वेळीही कर्णधार विराट कोहलीने बुमराहवर विश्वास दाखवला. बुमराहने या षटकात 13 धावा दिल्या. 14 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लोकेश राहुलने पहिल्या चेंडूवर षटकार व दुसर्‍या चेंडूवर चौकार ठोकत सामना टीम इंडियाच्या बाजूला झुकवला, मात्र तो तिसर्‍या चेंडूवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने दोन चेंडूंत सहा धावा करीत न्यूझीलंडवर सलग चौथा विजय मिळवला.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने टीम इंडियाला आठ बाद 165 धावांत रोखले होते. या सामन्यात भारताने रोहित शर्माला दिलेली विश्रांती न्यूझीलंडच्या पथ्यावर पडली. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची 6 बाद 88 अशी घसरगुंडी उडाली होती, पण मनीष पांडेने झळकाविलेल्या नाबाद अर्धशतकाने भारतीय डावाला आकार दिला. त्याने 36 चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद 50 धावांची खेळी उभारली. सलामीच्या लोकेश राहुलने 39 आणि शार्दूल ठाकूरने 20 धावा केल्या.
विजयासाठी 166 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत पुन्हा पलटी खाल्ली. नवदीप सैनीने 19वे, तर शार्दुल ठाकूरने 20वे षटक भेदक मारा करीत पुन्हा एकदा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply