अलिबाग : प्रतिनिधी – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपली रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी मी स्वीकारली आहे. सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी रविवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत सांगितले. अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी या वेळी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महेंद्र दळवी यांची शिवसेना रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दळवी बोलत होते. यापूर्वीही मी या पदावर काम केले आहे. त्या अनुभवाचा फायदा मी पक्षवाढीसाठी करणार आहे, असे महेंद्र दळवी यांनी सांगितले.
माझ्याकडे अलिबाग व पेण या दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. या दोन्ही मतदारसंघांत पक्ष जो उमेदवार देईल त्यांना निवडून आणण्याचा आपण पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू. पक्षाने निवडणूक लढविण्यास सांगितले तरच मी निवडणूक लढवेन. पक्ष जेथून सांगेल तेथून मी निवडणूक लढवेन, असेही दळवी यांनी स्पष्ट केले.