Breaking News

रणकीरेड्डी-शेट्टी अंतिम फेरीत दाखल

बँकॉक : वृत्तसंस्था

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सत्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत सोळाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यावर 22-20, 22-24, 21-9 अशी मात केली.

2018 साली सत्विकराज आणि चिराग शेट्टी जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकाविले होते. त्यानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची भारतीय जोडीची ही पहिलीच वेळ ठरली आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीसमोर तिसर्‍या मानांकित ली जुन हुई आणि ल्यू यु चेन या चिनी जोडीचं आव्हान असणार आहे.

पहिल्या सेटमध्ये कोरियन जोडीने आक्रमक सुरुवात केली. 3-0ने आघाडी घेत कोरियाच्या को संग ह्युन आणि शिन बाएक चिओल जोडीने भारतीय जोडीला बॅकफूटला ढकलले. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत कोरियन जोडी 11-10 अशी आघाडी होती, मात्र मध्यांतरानंतर भारतीय जोडीने दमदार पुनरागमन करीत कोरियन जोडीला धक्का दिला. अखेरच्या मिनीटांमध्ये कोरियन जोडीने दोन ब्रेक पॉईंट मिळवत सामना बरोबरीत नेला, पण सत्विकराज आणि चिरागने आपला अनुभव पणाला लावत पहिला सेट खिशात घातला.

दुसर्‍या सेटमध्ये दोन्ही जोड्या तोडीस तोड खेळल्या, मात्र कोरियन खेळाडूंनी भारतीय खेळाडूंची झुंज मोडून काढत 22-24ने बाजी मारली. तिसर्‍या सेटमध्ये भारतीय जोडीने कोरियन जोडीला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. 21-9च्या फरकाने सेट जिंकत भारतीय जोडीने सामनाही खिशात घातला.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply