Breaking News

सुषमा स्वराज पंचत्वात विलीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बुधवारी (दि. 7) पंचत्वात विलीन झाल्या. दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत स्वराज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुलगी बासुरी यांनी मुखाग्नी दिला.

सुषमा स्वराज यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राहुल गांधी, बसपच्या सर्वेसर्वा मायावती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांनी स्वराज यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

67 वर्षीय सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून स्वराज यांची जनमानसात ओळख होती. प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक लढविली नव्हती.

काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे स्वराज यांचे ट्विट अखेरचे ठरले. त्यात त्यांनी ‘मोदीजी धन्यवाद, मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहत होते,’ असे नमूद केले होते.

स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी चोख बजावली. एका ट्विटवर त्या जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात अडकलेल्या भारतीयाला मदत करीत असत. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भारतीय राजकारणातील ‘सुपरमॉम’ असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.

अंत्यदर्शन घेताना नरेंद्र मोदींना अश्रू अनावर

सुषमा स्वराज यांच्या जाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. स्वराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जंतरमंतर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी तेथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. या वेळी ते भावूक झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूही तरळले.

खारघर येथील आठवणी जाग्या

सुषमा स्वराज 2014मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी खारघर येथे आल्या होत्या. टोलच्या प्रश्नावरून आमदार प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारार्थ खारघर येथे 9 ऑक्टोबर रोजी सभा झाली होती. या वेळी स्वराज यांनी आपल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply