पनवेल ः प्रतिनिधी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे पनवेल परिसराला शैक्षणिक वारसा आणि परंपरा लाभली आहे, हे कोणीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 14) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात बोलताना केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या या समारंभास राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त दत्तात्रेय जगताप, विशेष अतिथी म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषण करताना रामशेठ ठाकूर यांनी आज लोकांकडून आमच्या भागात शाळा काढा, अशी मागणी होत असल्याचे सांगितले. गव्हाणला पहिली शाळा आम्ही काढली. तिथे भव्यदिव्य इमारत बांधण्याचा आमचा विचार आहे. ओवेपेठ येथे गावाने दिलेल्या जागेत आमची शाळा चालवतो. सिडकोच्या अध्यक्षांनी आम्हाला तिथे शाळेसाठी जागा द्यावी, अशी मागणी करून जागा दिली तर तिथे चांगली इमारत बांधून महाविद्यालय सुरू करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनार्दन भगत साहेबांना शिक्षणाची आवड होती. त्यांनी रयत संस्थेची शाळा इकडे आणली. त्यामुळे आमचे शिक्षण झाले. त्यांचे स्मारक म्हणून आम्ही ही संस्था स्थापन करून शाळा काढल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली.
जनार्दन भगत यांना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे त्यांची आठवण राहण्यासाठी ही शिक्षण संस्था काढण्यात आली. शिक्षण हा व्यवसाय न समजता आपल्याला काहीतरी गुणात्मक द्यायचे आहे. विद्यार्थ्यांना संस्कारित करून एक पिढी घडवायची आहे. या उद्देशाने जनार्दन भगत शिक्षण संस्था काढण्यात आली, असे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त दत्तात्रेय जगताप यांनी या संस्थेची प्रगती उत्साहवर्धक असल्याचे सांगून येथे सेवाभावी पध्दतीने काम चालताना दिसते, असे प्रमाणपत्र दिले.
मुख्यमंत्री निधीसाठी आमदारांनी दिले साडेपाच लाख
सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिक साडेपाच लाखांचा आणि कर्मचार्यांचा तीन लाख 20 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री निधीसाठीचे धनादेश पालकमंत्र्यांकडे दिले.