Breaking News

एसबीआय डेबिट कार्ड होणार हद्दपार

मुंबई : प्रतिनिधी

भारतातील मोठी आणि सर्वाधिक शाखा असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसबीआय बँकिग प्रणालीतून डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा विचार करत आहे. देशातील बहुतांश एसबीआय ग्राहक डेबिट कार्डवर अवलंबून आहेत, मात्र तरीही बँकेने या निर्णयाची तयारी केली आहे. डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा आमचा इरादा आहे आणि आम्ही ते नक्कीच करु, असं बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितलं.

रजनीश कुमार म्हणाले की, देशभरात सध्या सुमारे 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत. डेबिट कार्डलेस देश बनवण्यासाठी ‘योनो’ प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वाची असेल. या ‘योनो’ प्लॅटफॉर्मद्वारे कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात किंवा कार्ड स्वाईप न करता खरेदी करता येऊ शकते.

बँकेने आधीच 68 हजार ‘योनो’ कॅशपॉईंट्स बसवले आहेत. येत्या दीड वर्षात कॅशपॉईंट्सचा हा आकडा 10 लाख करण्याची योजना आहे, जेणेकरून कार्डचा वापर आणखीच कमी होईल. येत्या पाच वर्षात प्लॅस्टिक कार्डचा (डेबिट कार्ड) वापर मर्यादित होईल. तसेच येत्या काळात ग्राहकांच्या खिशातील क्रेडिट कार्ड हा ‘स्टॅण्ड बाय’चा पर्याय म्हणूनच राहील, असं रजनीश कुमार यांनी सांगितलं. स्टेट बँक ऑफ इंडियाने या वर्षी मार्च महिन्यात ‘योनो कॅशपाईंट्स’ सेवा सुरू केली आहे, ज्यामधून ग्राहक डेबिट कार्डच्या वापराशिवाय पैसे काढू शकतात. ही अतिशय सोपी आणि सुरक्षित सेवा आहे. सुरुवातीला ही सेवा 16 हजार 500 एटीएममध्ये उपलब्ध होती. आता बँक आपले सगळे एटीएम या सेवेने अपग्रेड करत आहे.

ग्राहकांसाठी एसबीआयची खास कर्ज योजना

मुंबई : सणासुदीच्या दिवसात घर, गाड्या, खरेदी करण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणार्‍या भारतीय स्टेट बँकेनं सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास कर्ज योजना आणल्या आहेत. गाड्या खरेदी करण्यासाठी दिल्या जाणार्‍या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग फी माफ करण्यात येणार आहे. तर गृह, गाड्या आणि वैयक्तिक कर्जावर आकारण्यात येणारे व्याजदरही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय वैयक्तीक कर्ज आणि शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीसाठी मोठा कालावधीही मिळणार आहे. गाड्यांसाठीचं कर्ज अवघ्या 8.70 टक्के दरानं मिळणार असून ठराविक कालावधीसाठी हा दर स्थिर ठेवला जाणार आहे. शिवाय नोकरदार वर्गाचं चार चाकी गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किमतीच्या तब्बल 90 टक्के कर्ज मिळणार आहे. शिवाय बँकेचा गृहकर्जावरील व्याज दर बाजारात सर्वात कमी म्हणजे 8.05 टक्के इतका आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणार्‍यांसाठीही ही महत्वाची बाब आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply