पनवेल : रामप्रहर वृत्त
शासनाच्या वतीने पनवेलमध्ये उभारण्यात येत असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिटच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, या कामाची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 26) पाहणी केली.
रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट सुरू होणार आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे.
या पाहणी दौर्यात पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अमर पाटील, डॉ. अरुणकुमार भगत आदी सहभागी झाले होते, तर अधिकारी वर्ग सोबत होता. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.