पनवेल ः रामप्रहर वृत्त
कामोठे विभागातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे, त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे, यामुळे अपघतांची शक्यता आहे, हे खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सिडकोच्या कामोठे विभाग कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनातून केली आहे.
कामोठे विभागातील रस्त्यांवर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी वारंवार याबाबत तक्रारी केल्या, परंतु त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. आता तरी सिडको कामोठे विभागाने गांभीर्याने याकडे लक्ष देऊन हे खड्डे बुजवावेत, अशी आग्रही मागणी डॉ भागत यांनी केली आहे.
तसेच सेक्टर पंधरामधील शिवमंदिरासमोर असलेल्या तलावाच्या सुशोभिकरणाचे काम चालू असून या तलावात कंत्राटदाराने पावसापूर्वी केलेल्या अर्धवट बांधकामातील बर्याचशा लोखंडी सळ्या उघड्या आहेत. गणपती उत्सात गणेशमूर्ती विसर्जनावेळी या सळ्यांमुळे अपघात होऊ शकतात, त्यामुळे या सळ्या अच्छादित कराव्यात, अशी मागणीही डॉ. भगत यांनी केली आहे.