गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालीत शांतता कमिटीची बैठक
पाली : प्रतिनिधी
सामाजिक सलोखा व एकात्मता वृध्दिंगत करणार्या गणेशोत्सवात समाज प्रबोधनाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवण्यावर भर द्या, असे आवाहन पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. यापुढे येणारा प्रत्येक सण व उत्सव शांतता व सलोखा राखत साजरा करा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सुधागड तालुक्यातील गणेश मंडळांनाही मार्गदर्शन केले. उत्सवाचे मांगल्य राखणारी गाणी व सांस्कृतिक कार्यक्रम ठेवावेत. रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच डिजे व डॉल्बीला बंदी असल्याने नियम व कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, आदी सूचना रवींद्र शिंदे यांनी या वेळी केल्या. या बैठकीस सुनील दांडेकर, प्रकाश कारखानीस, ग. रा. म्हात्रे, गोविंद शिंदे, डॉ. अपूर्व मुजुमदार, गणपत सीतापराव, संजय घोसाळकर, बशीरभाई परबळकर, अभिजित चांदोरकर, नरेश खाडे, सुलतान बेनसेकर, पोलीस हवालदार प्रफुल्ल चांदोरकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक, गणेश मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.