पनवेल : बातमीदार
लोकल पकडण्याच्या घाई गडबडीत पनवेल रेल्वे स्थानकावर एका महिलेची पर्स विसरली. पनवेल रेल्वे पोलीस कुलदीप सिंग यांनी बंदोबस्तात असताना पर्स ताब्यात घेऊन पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिसांनी महिलेची पर्स तिच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केली आहे.
संजय गोपाळा गोंडाणे (रा. सीवूड, नवी मुंबई) यांच्या पत्नी पनवेल येथून सोमवारी (दि. 26) सकाळी पनवेल रेल्वेस्थानकावरून चिपळूणला जाणार होत्या. प्लॅटफॉर्म क्रमांक सहा व सात या ठिकाणी सिमेंटच्या कट्ट्यावर त्या बसल्या होत्या. वाट पाहत असताना त्यांनी तेथे त्यांची पर्स ठेवली होती. गोंडाणे हे रेल्वे आल्यानंतर घाईघाईने जाताना त्यांची पर्स बाकड्यावर तशीच राहिली. या वेळी पनवेल रेल्वे पोलीस फोर्सचे कर्मचारी कुलदीप सिंग हे प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असताना त्यांना बाकड्यावर पर्स सापडली. त्यांनी ती घेऊन पोलीस चौकीत आले असता पर्समधील मोबाईलची रिंग वाजू लागली. तेव्हा त्यांनी ती पर्स उघडली. या मोबाईलवरून संजय गोपाळा गोंडाणे यांना फोन करून पर्स ताब्यात असल्याची माहिती दिली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र किंमत 70 हजार रुपये, सोन्याचा हार किंमत 25 हजार रुपये, कानातले किंमत 15 हजार रुपये असे मिळून साधारणतः एक लाखाच्या आसपास किमतीचा ऐवज त्या पर्समध्ये होता, मात्र रेल्वे पोलीस कुलदीप सिंग यांच्या माणुसकीमुळे त्या महिलेला पर्स परत केली. या चांगल्या कामामुळे गोंडाणे कुटुंबीयांनी कुलदीप सिंग आणि रेल्वे पोलीस फोर्सला चांगल्या कामामुळे धन्यवाद दिले आहेत.