नागोठण्यात पुन्हा पूर

दरड पडल्याने भिसे खिंडीतील रस्ता; तसेच नागोठणे रोहे रेल्वे मार्ग ठप्प

नागोठणे : प्रतिनिधी

मंगळवारी सायंकाळपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने आपले पात्र सोडून शहरात प्रवेश केल्याने नागोठण्यात दुपारपर्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी दुपारपर्यंत पुराने नागोठणे बाजारपेठ, तसेच कोळीवाडा, बंगलेआळी, शिवाजी चौक व्यापून गेला होता. दरम्यान, ग्रामपंचायत, तसेच पोलीस आणि महसूल यंत्रणा पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मंगळवारी सायंकाळपासून पावसाने उग्ररूप धारण केल्याने अंबा नदीने मध्यरात्री आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केला. बुधवारी पहाटे एसटी बसस्थानक, शिवाजी चौक, कोळीवाडा भागात पुराचे पाणी चढण्यास प्रारंभ झाला होता. पावसाचा जोर कायमच राहिल्याने पुराचे पाणी आणखी वेगाने भरण्यास सुरुवात झाल्याने घर, तसेच दुकानातील सामानाची हलवाहलवी करण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. नागोठणे कोळीवाड्यात अनेक घरांमध्ये गणपती विराजमान झाले असल्याने अनेकांची धावपळ उडाली. या भागात पाण्याची पातळी 10 फूट इतकी असल्याने ग्रामपंचायतीने सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्याने गणपतीची मूर्ती घरात ठेऊनच त्यांना घराबाहेर जावे लागले होते, तर घराबाहेर पडण्यापूर्वी काहींनी पाण्यात उभे राहूनच आपल्या घरातील बाप्पांची आरती केली. तेथील सुभाष जामकर यांच्या मूर्तीला पुराचे पाणी लागल्याने त्यांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी पुराचे पाणी चढत असल्याचे कळल्यानंतर येथील पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नितीश पाटील आणि महिला पोलीस प्रतीक्षा गायकवाड यांनी विशेष सहकार्य केल्याने शासकीय यंत्रणांना वेळीच उपाययोजना करण्यात यश मिळाले होते. प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार कविता जाधव यांनी बुधवारी दुपारी स्थानिक महसूल यंत्रणेसह पुराची पाहणी केली. पूरग्रस्तांसाठी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, सदस्य शैलेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर साळुंके यांच्या पुढाकारातून नागोठणे ग्रामपंचायतीकडून मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

दाम्पत्य वाचले

अंबा नदीस आलेल्या पुराच्या पाण्यात शेजारील चिकणी गावाच्या हद्दीत हॉटेल गुलमोहरमागे दोनशे मीटर पाण्यात भगवान श्रावण जाधव (वय 30) आणि भारती भगवान जाधव (वय 20, दोन्ही रा. धोबेवाडी (पाच्छापूर) ता. सुधागड) हे दाम्पत्य अडकले होते. त्यांना साई मोहन राठोड, लोकेश शिवा नायक या स्थानिक ग्रामस्थांनी पोहत जाऊन रबरी ट्यूबच्या सहाय्याने सुरक्षितपणे पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.

भिसे खिंडीत दरड कोसळली

रोहे-नागोठणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक काही तास ठप्प झाली होती. संबंधित खात्याची यंत्रणा तेथे उपस्थितच नसल्याने नागोठणे पोलिसांनी पडलेली झाडे तोडून, तसेच मातीसुद्धा बाजूला घेतल्याने दुपारनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली, तर सकाळी पावणेअकरानंतर रोह्याहून रवाना झालेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वे 11 वाजता नागोठणे रेल्वेस्थानकात आल्यानंतर या मार्गावर दरड कोसळल्याने ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दुपारी 3 नंतर पुन्हा सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.

हवामान खात्याच्या सूचनेनुसार मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागोठण्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी.

-डॉ. मिलिंद धात्रक, सरपंच, नागोठणे

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply