Breaking News

नेरळ वाल्मिकीनगर शाळेच्या वर्गखोलीचे काम ठप्प

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, पालक संतप्त

कर्जत : बातमीदार

 नेरळ वाल्मिकीनगर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत असल्याने तेथे नवीन वर्गखोली मंजूर करण्यात आली आहे, मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बांधण्यात येत असलेल्या या वर्गखोलीचे काम मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाले आहे. कर्जत तालुक्यातील नेरळमधील वाल्मिकीनगर भागात असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यांमध्ये एकूण 96 विद्यार्थ्यांना कोंबून बसविले जात आहे. त्यामुळे तेथे सर्व शिक्षा अभियानामधून एक वर्गखोली मंजूर करण्यात आली होती. तिच्या प्रत्यक्ष बांधकामास जानेवारी महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. ठेकेदाराने एप्रिल महिन्यात हे  बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते, मात्र ते अत्यंत संथगतीने सुरू असून मागील दोन महिने तर पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षातदेखील या शाळेतील विद्यार्थी दाटीवाटीने  बसून शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षण कसे द्यायचे, असा प्रश्न  शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. पालकही नाराज आहेत.  शाळेच्या आवारात बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात वादळी वार्‍याने येथील सुलभ स्वच्छतागृहाचे पत्रे उडून बाजूच्या घराजवळ पडले होते.

वर्गखोलीच्या बांधकामाची गती अत्यंत धीमी असल्याने या कामाकडे लक्ष नसलेला ठेकेदार बदलून अन्य कोणास काम द्यावे, अशी मागणी आम्ही ग्रामस्थ तालुका शिक्षण अधिकार्‍यांकडे अर्जाद्वारे करणार आहोत.

-राहुल मुकणे, स्थानिक रहिवासी, वाल्मिकीनगर, नेरळ

शाळेचे काम सुरू झाल्यानंतर रेंगाळणार याची आम्हाला खात्री होती. दिवाळीपूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही, तर  इमारत पूर्ण होण्यासाठी आंदोलन करू.

-प्रकाश वाघ, पालक आणि माजी सदस्य, नेरळ ग्रामपंचायत

नेरळ वाल्मिकीनगर येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीच्या बांधकामाबाबत स्थानिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. या वर्गखोलीचे काम पूर्ण व्हावे म्हणून आम्ही सूचना करीत होतो. ठेकेदार नियमानुसार काम करणार नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

-सुरेखा हिरवे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, कर्जत

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply