

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर दवाखाना सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. देशातील ज्या रेल्वेस्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात त्या ठिकाणी अशी सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या दवाखान्यांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. काही वेळा अनेक महिलांची सुरक्षित प्रसूती रेल्वे स्थानकावर झाल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो, पण अशी चांगली योजना अधिकार्यांच्या चुकीमुळे पनवेल रेल्वे स्टेशनवर सध्या अडचणीत सापडली आहे.
पनवेल रेल्वे स्टेशन हे कोकण आणि मध्य रेल्वेला जोडणारे मध्य रेल्वेचे एक महत्त्वाचे स्टेशन आहे. नवी मुंबई विमानतळ आणि नैना प्रोजेक्टमुळे पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलमध्ये भविष्यात मुंबईतील रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे जंक्शन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे कामही सुरू आहे. या स्टेशनवरून मेल, एक्स्प्रेसबरोबरच लोकल ट्रेनची वाहतूक होत असल्याने या स्टेशनवरून रोज लाखो प्रवासी ये-जा करीत असतात. या ठिकाणी अनेक वेळा अपघातात जखमी झालेल्यांना किंवा लांब पल्ल्याच्या गाडीतील प्रवाशाला तातडीची वैद्यकीय मदत हवी असल्यास पनवेल शहरातील दवाखान्याशिवाय पर्याय नाही. पनवेलमधील वाहतूक कोंडीमुळे अशा रुग्णाला वेळेवर वैद्यकीय सेवा मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्राणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
यासाठी पनवेल रेल्वे स्टेशन सल्लागार समितीने पनवेल स्टेशनवर दवाखाना सुरू करण्याची मागणी अनेक वेळा केली होती. या मागणीचा पाठपुरावा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्यामुळे पनवेल स्टेशनवर दवाखाना मंजूर करण्यात आला, पण त्याची जागा ठरवण्यासाठी आलेल्या अधिकार्यांच्या समितीने कोणालाही विश्वासात न घेता नवीन पनवेल बाजूला एका कोपर्यात सदर दवाखान्यासाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी वन रूपी क्लिनिक नुकतेच सुरू करण्यात आले.
येथे डॉक्टर 24 तास उपलब्ध असतात, पण या भागातून प्रवाशांची ये-जा नसल्याने कोणालाच हा दवाखाना लाक्षत येत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी दाखवण्यात आलेल्या फलकावर दिशादर्शक बाण चुकीची दिशा दाखवत आहे. येथे तपासणी फी एक रुपया असून कमीत कमी दरात ईसीजी, रक्त तपासणी, ड्रेसिंग, रक्तदाब तपासणी, युरिन, सलाइन व इतर आरोग्य तपासण्या करून मिळण्याची सोय आहे.
दवाखान्यात येण्यासाठी सगळे फलाट ओलांडून जिना चढून येणे ही रुग्णांच्या दृष्टीने अवघड गोष्ट आहेच, पण आणीबाणीप्रसंगी डॉक्टरांनाही जिना चढून पलीकडे रुग्णापर्यंत पोहचणे अवघड आहे. छताचे काम व्यवस्थित न केल्याने सगळीकडे गळत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणांना शॉक लागण्याची शक्यता आहे. त्याच्या मागे मोकळ्या जागेत गवत आणि झुडपे वाढल्याने तेथून विषारी साप दवाखान्यात येतात. त्यामुळे तेथील परिचारिका आणि रुग्णांत घबराट पसरली आहे.
सोमवारी भाजपच्या बूथ अध्यक्षा वैशाली पाटील त्या ठिकाणी रुग्णांना घेऊन गेल्या असता दवाखान्यात पाणी नसल्याचे दिसून आले. या ठिकाणी पाण्याची सोय ज्या ठिकाणाहून केली आहे, तेथील कर्मचारी पाणी आल्यावर दवाखान्याला पाणी मिळण्यासाठी असलेला कॉक बंद करून ठेवत असल्याने येथे अनेक वेळा पाणी नसल्याचे समजले. त्यामुळे डॉक्टर आणि परिचारिकांची मोठी अडचण होते. महिलांना तपासण्यासाठी स्वतंत्र केबिन नसल्याचेही दिसून आले. त्या ठिकाणी बसलेल्या पुरुष रुग्णांसमोर महिलांना
अवघडल्यासारखे होत असल्याचे महिलांनी सांगितले. विषारी सापांचाही तेथे संचार असल्याने तेथील डॉक्टर, परिचारिका आणि येणार्या रुग्णांत भीतीचे वातावरण आहे.
या ठिकाणी दवाखाना सुरू करणार्या ’मॅजिक डील’ने जीवरक्षक औषधे, इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा ठेवला नाही. त्यामुळे एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास डॉक्टरांची पंचाईत होणार आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी लावलेले दरपत्रक वाचून रुग्ण येतात, पण त्या ठिकाणी नवीन दराने पैसे घेतले जातात. त्यामुळे अनेकांची अडचण होते. शासनाच्या एका चांगल्या योजनेचा अधिकार्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सामान्य माणसाला फायदा मिळणार नाही. यासाठी वेळीच रेल्वे प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची मागणी वैशाली पाटील यांनी केली आहे.
-नितीन देशमुख, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper