बंगळुरू : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या तिसर्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील सहकार्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ’तुम्ही सुरक्षित भावनेतून बाहेर पडून जोखीम पत्करावी. जोखीम पत्करल्याशिवाय संघ निडर होऊच शकत नाही,’ असे विराटने म्हटले आहे.
आयपीएल कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणार्या विराटला एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीची वैशिष्ट्ये आणि उणिवा ठाऊक आहेत. तरीही त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संघ पराभूत झाला. त्यानंतर विराटने त्यावर स्पष्टीकरणही दिले. संघाने सुरक्षित भावनेतून बाहेर पडून जोखीम पत्करायला हवी. कारण जोखीम घेतल्याशिवाय संघ निर्भय होऊ शकत नाही, असे तो म्हणाला.
जोपर्यंत खेळ सुरू होत नाही, तोपर्यंत काहीही ठरलेले नसते. अनुकूल परिस्थितीतून बाहेर पडून खेळण्याची तुमची तयारी असेल, तर नाणेफेकीवेळी काय घडले याची भीती वाटणार नाही. नेमके हेच करण्याचा आमचा विचार आहे, असेही विराटने नमूद केले.
भारतीय संघाचा फलंदाजी क्रम तळापर्यंत आहे. याबाबत विराट म्हणाला, आमचे नवव्या स्थानापर्यंत फलंदाज आहेत. त्यामुळे ज्यांना खेळवणे शक्य आहे, त्यांना खेळवण्याचा प्रयत्न केला. प्रथम फलंदाजी करा अथवा गोलंदाजी करा, तुम्ही चांगल्या स्थितीत आहात हे तुम्हाला माहीत असते. मानसिकरीत्या तुम्ही स्वतःला या परिस्थितीत घेऊन गेलात, तर कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची तुमची तयारी असते.
…तर विराटवर बंदीची कारवाई नवी दिल्ली : बंगळुरूत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानात केलेल्या गैरवर्तनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला समज दिली आहे, तसेच आयसीसीचा नियम भंग केल्याप्रकरणी नकारात्मक गुणही दिला आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात धाव काढताना ब्युरेन हेंड्रिक्सला जाणूनबुजून धक्का दिल्याप्रकरणी विराटला दोषी ठरवण्यात आले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार दोन वर्षांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूला चार नकारात्मक गुण मिळाल्यास तो सस्पेन्शन पॉइंट मानला जातो. अशा परिस्थितीत आयसीसीकडून कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते. विराटच्या खात्यात आणखी एका नकारात्मक गुणाची भर पडल्यास त्याच्या अडचणींत वाढ होऊ शकते.