उरण ः प्रतिनिधी
जेएनपीटीमध्ये 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएनपीटीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली.
‘स्वच्छता पंधरवडा’ दरम्यान रोज स्वच्छतेशी संबंधित एक उपक्रम राबविण्यात आला. ‘पंधरवडा’विषयी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार करून जेएनपीटीच्या प्रत्येक विभागात वितरित करण्यात आली. सर्व विभाग व शालेय मुलांनी ‘पंधरवडा’ अत्यंत प्रभावी पद्धतीने साजरा केला. कार्यालयाची देखभाल व कार्यालयाची साफसफाई, कार्यालय परिसरातील सर्व स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी व दुरुस्तीची कामे करणे, जुन्या फाईल्स नष्ट करणे, जुने न वापरलेले फर्निचर, विद्युत व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विल्हेवाट लावणे, पोर्ट रोडची स्वच्छता करणे यासारखे उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत उद्याने व टाऊनशिपमध्ये सुशोभीकरण व साफसफाईचे कार्य करण्यात आले.
घाट, मेन स्टोअर्स, वर्कशॉप, प्रशासन भवन, हॉस्पिटल, मल्टिपर्पज हॉल, अधिकारी क्लब, कर्मचारी क्लब, अतिथीगृह, प्रशिक्षण केंद्र, पोर्ट ऑपरेशन सेंटर आणि पोर्ट यूजर्स बिल्डिंग अशा सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
जेएनपीटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता संकल्पनेवर निबंध, नारा लेखन, चित्रकला आणि वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. जेएनपीटी टाऊनशिपमधील रहिवाशांमध्ये स्वच्छता जागृतीसाठी शालेय मुलांनी आयोजित केलेल्या सायकल रॅलीला जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला.
याबाबत संजय सेठी म्हणाले की, स्वच्छ जेएनपीटी आणि स्वच्छ भारत हे जेएनपीटीचे अविरत मिशन आहे जे स्वच्छतेला आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा पैलू बनविण्याच्या प्रयत्नांना बळ देत आहे व जेएनपीटीला स्वच्छता व स्वच्छतेसह प्रत्येक क्षेत्रात आदर्श पोर्ट बनवत आहोत.