पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडको महामंडळातर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 814 व महागृहनिर्माण योजनेतील 9,249 घरांकरिता अर्जदारांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 814 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता आतापर्यंत 27 हजार 310 व 9,249 घरांच्या महागृहनिर्माण योजनेकरिता 45 हजार 34 जणांनी अर्ज केले आहेत. सिडकोतर्फे नुकत्याच गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. या गृहनिर्माण योजनांतील सर्व घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध आहेत. सदर गृहनिर्माण योजनांकरिता अर्ज करण्याकरिता इच्छुक अर्जदारांस मुदतवाढ देण्यात येऊन ुुु.लळवले.पर्ळींरीरज्ञशपवीर.ळप या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 5 नोव्हेंबर, 2019, तर अनामत रक्कम व अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबर अशी असणार आहे. सदर योजनांची सोडत 26 नोव्हेंबर रोजी काढण्यात येईल. सिडको गृहनिर्माण योजना 2018 मधील यशस्वी अर्जदारांना घरांच्या हफ्त्याची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करावयाची आहे. यासाठी डीडी अथवा धनादेश याद्वारे रक्कम स्वीकारली जाणार नाही. ज्या यशस्वी अर्जदारांना तारण ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे अशा अर्जदारांकरिता सिडको निवारा केंद्राच्या संकेतस्थळावर त्यासाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.