
नागपूर : प्रतिनिधी
नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागवंशीयांच्या भूमीत लाखो वंचितांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्मक्रांतीचा 63वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजता दीक्षाभूमीवर साजरा होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून थायलंडचे पूज्य भन्ते डॉ. परमहा अनेक व म्यानमारचे महाउपासक टेंग ग्यार यांची उपस्थिती राहणार आहे. यंदा प्रथमच निवडणूक आचारसंहिता लागली असल्याने राजकीय हजेरीला फाटा मिळाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनाला धार्मिकता व वैचारिकतेचे स्वरूप आले आहे. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी पत्रकार परिषदेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाची माहिती दिली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम शनिवारी 5 ऑक्टोबरपासूनच सुरू झाले. मंगळवारी 8 ऑक्टोबरला मुख्य सोहळा होईल. या सोहळ्याला जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट अशा जगभरातील भिक्षूंसह विद्वान बौद्ध प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने चार दिवस वैचारिक क्रांतीचा जल्लोष असतो. अशोक विजयादशमीच्या पर्वावर दीक्षाभूमीवर भीमसागराला उधाण येते. शनिवारी (दि. 5) सायंकाळी महिला धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता. ‘नवीन शैक्षणिक धोरण व त्याचे दूरगामी परिणाम’ या विषयावर महिला परिषद घेण्यात आली. या वेळी डॉ. कमल गवई या अध्यक्षस्थानी होत्या, तर उद्घाटक म्हणून रेखा खोब्रागडे आणि वक्ते म्हणून प्रा. प्रतिभा अहिरे, वंदना बनकर, तक्षशीला वागधरे, डॉ. सविता कांबळे, प्रा. सरोज आगलावे, डॉ. प्रज्ञा बागडे, छाया खोब्रागडे, वंदना जीवने आदींची उपस्थिती होती. रविवार (दि. 6) पासून मुख्य धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर मंगळवार (दि. 8) पर्यंत दिवसभर विविध धार्मिक व वैचारिक कार्यक्रम होतील. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेला स्मारक समिती अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य एन. आर. सुटे, कैलास वारके आदी मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper