पनवेल ः रामप्रहर वृत्त
अडलाईड ऑस्ट्रेलिया येथे नुकत्याच झालेल्या 17व्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेममध्ये पनवेल तालुक्यातील दापोली गावामधील शशिकांत जितेकर यांनी भाला फेक या स्पर्धेत सुवर्णपदक, तसेच थालीफेकमध्ये रजत पदक, हॅमर फेकमध्ये रजत आणि वेटफेकमध्ये रजत अशा चार पदकावर आपले नाव कोरले आहे. सतराव्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेम 2019 या झालेल्या स्पर्धेमध्ये 23 देशांनी भाग घेतला होता, तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकूण 7800 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारतामधून भालाफेक, थालीफेक, हॅमरफेक व वेटफेक या स्पर्धेसाठी शशिकांत जितेकर यांनी प्रतिनिधित्व केले. 45 वर्षे वयोगटाच्या भालाफेक स्पर्धेत शशिकांत जितेकर यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले, तर थालीफेक, हॅमरफेक व वेटफेकमध्ये रजत पदक पटकावले. शशिकांत जितेकर हे तुर्भे येथील लुब्रिझॉल या कारखान्यात वरिष्ठ अधिकारी या पदावर कार्यरत आहेत, असे असताना देखील त्यांनी आपली खेळाडू वृत्ती जोपासून स्पर्धेत चांगले यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मैदानी खेळामधील हे त्याचे 11वे पदक आहे. 17व्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेमसाठी त्यांची कंपनी लुब्रिझॉल अड्डीटिव्हस इंडिया प्रा. लिमिटेडने त्यांना स्पॉन्सर केले आहे. त्यांनी कंपनीसाठी, तसेच आपल्या देशासाठी चार पदके जिंकली आहेत. यांच्यावर पनवेल तालुक्यासह देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.