Breaking News

सुसंस्कृत सरकारचे संकल्प

सत्तेचा माज असणार्‍या, निव्वळ निवडणुकांच्या तोंडावर लोकानुनय करून नंतर त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवणार्‍या राज्यकर्त्यांना वर्षानुवर्षे सहन केल्यानंतर महाराष्ट्रातील सुजाण जनतेने फडणवीस यांच्या सुसंस्कृत सरकारला आपला कौल दिला. हीच सुसंस्कृत राजवट राज्यात पुढे सुरू रहावी याकरिताच राज्यातील जनता पुन्हा एकदा त्यांच्याच बाजूने कौल देईल हे निश्चित.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच दिवस उरलेले असताना काही राजकीय पक्षांकडून आश्वासनांची अक्षरश: हास्यास्पद खैरात केली जाते आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षाने मात्र वास्तव परिस्थितीशी सुसंगत अशा नेमक्या उद्दिष्टांबद्दल बोलणेच पसंत केले आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते मंगळवारी पक्षाचे संकल्पपत्र जाहीर करण्यात आले. आपली जनमानसातील प्रतिमा काय, कोणत्या मुद्द्यांवरून लोकांनी आपल्याला नाकारले याचे कुठल्याही प्रकारचे भान न बाळगता काही पक्ष भलतीच आश्वासने देऊन लोकांना आपल्यावर भिस्त ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. अशावेळी भाजपचे संकल्पपत्र म्हणजे दिशा व दृष्टी असलेल्या सरकारने विकासाच्या मार्गावरील आपला प्रवास पुढे सुरूच राहणार असल्याच्या ठाम खात्रीतून पुढील वाटचालीचे मांडलेले योजनापत्र वाटते. जनतेला भूलथापा मारणार्‍या जाहीरनाम्यांसमोर भाजपचे संकल्पपत्र मात्र निव्वळ मतदारांचे औत्सुक्य शमवण्यासाठी येत्या पाच वर्षांतील कामांचा अंदाज व्यक्त करते. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलली असून त्यांच्या कार्यशैलीचे प्रतिबिंब या संकल्पपत्रातही दिसते. दुष्काळ हाच महाराष्ट्रासमोरचा सर्वात बिकट प्रश्न आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा नेमका आराखडा भाजपच्या संकल्पपत्रातून जाहीर करण्यात आला आहे. समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याची तसेच वैनगंगेचे पाणी पश्चिम विदर्भात वळवण्याची योजना यात नमूद केलेली आहे. रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात फडणवीस सरकारने आधीच चांगले काम केले आहे. त्यात आता येत्या पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार मिळवून देण्याची योजना सरकार राबवणार आहे. रस्तेबांधणी, सौरऊर्जा, महिलांचे बचतगट, टेकपार्क आदींबद्दल नेमक्या योजना संकल्पपत्राद्वारे मांडणार्‍या फडणवीस यांनी पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या प्रकरणात ठेवीदारांची ससेहोलपट थांबवण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन देखील दिले आहे. फडणवीस सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तडफेने काम करतात हे जनतेने गेल्या पाच वर्षांत अनुभवलेच आहे. असंघटित क्षेत्रातील रोजगार असोत वा टोलमुक्ती, फडणवीस सरकारने दिलेल्या आश्वासनांनुसार भरीव काम आधीच केले आहे. त्यामुळेच आज जालना येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले ते खरेच आहे. मराठवाड्याने महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री दिले. परंतु फडणवीसांनी अवघ्या पाच वर्षांत केलेल्या कामातूनच त्यांच्या सरकारची यशस्वी सरकार अशी प्रतिमा उभी राहिली आहे. त्यामुळे त्यांचे संकल्पपत्र हे सातत्यपत्र अधिक वाटते. 2014च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने तर या सरकारने पूर्ण केलीच, परंतु आश्वासन न दिलेल्या कामांनाही हात घातला. शेतकर्‍यांची कर्जमाफी असो वा मराठा आरक्षण फडणवीस सरकारने खर्‍या अर्थाने काम करून दाखवले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply