एचसीएल 21013 बॅचचा वापर थांबवण्याचे आदेश
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोरोना रुग्णांवर दुष्परिणाम (साइड इफेक्ट) होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या एचसीएल 21013 वापर तत्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत.
राज्यात कोरोना परिस्थिती बिकट असताना रुग्णालयांकडून रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होताना दिसून येत होता, मात्र रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानेच रुग्णांवर त्याचा साईड इफेक्ट्स झाल्याचा प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे. रायगडात आधीच रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत होता. त्यातच आता दूषित रेमडेसिवीरचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
काही रुग्णांना हेटेरो हेल्थकेअर कंपनीची कोविफोर नामक लसचे डोस दिल्यानंतर त्रास झाल्याचे दिसून आले. यानंतर कंपनीने कोविफोर नावाच्या बँच नंबर एचसीएल 21013 इजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे विनंती केली. तांत्रिक कारणामुळे या बॅचमधील सर्व रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबविण्यात यावा, असे कंपनीने जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले. जिल्हा अन्न औषध प्रशासनानेही या संदर्भात आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकार्यांचा दुजोरा
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी या विषयावर म्हणाल्या की, जिल्ह्याला 500 इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता. त्यातील 120 रुग्णांना इंजेक्शन देण्यात आली. त्यापैकी 90 जणांना थंडी, ताप आणि इतरही त्रास होऊ लागला. याबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यावर लगोलग जिल्हा प्रशासनाने अन्न व औषध प्रशासनाला या स्टॉकचा वापर थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे उर्वरित स्टॉक परत मागवण्यात आला. राज्य शासनाकडूनही या स्टॉकचा वापर थांबवावा, अशा प्रकारची सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.