पंतप्रधान मोदींची घेतली भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
युरोपियन संघ (ईयू)चं संसदीय प्रतिनिधीमंडळ मंगळवारी (दि. 29) काश्मीर दौरा करण्यासाठी रवाना झाले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादं परदेशी शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये पाहणी करणार आहे. 21 जणांचं हे शिष्टमंडळ दिल्लीहून काश्मीरला रवाना झालंय. 11 वाजेच्या दरम्यान हे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिष्टमंडळ काश्मीरमध्ये येत आहे. हे शिष्टमंडळ काश्मीरचे राज्यपाल, खासदार आणि तरुणांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे या शिष्टमंडळाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काश्मीरला रवाना होण्यापूर्वी युरोपियन खासदारांच्या या प्रतिनिधी मंडळानं सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची भेट घेतली. अमेरिका आणि इतर देशांकडून काश्मीरला दिलेल्या विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आणल्यानंतर तिथल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली गेलीय. यामुळे या दौर्याचं आयोजन करण्यात आलेय. दरम्यान, ‘हे प्रतिनिधी मंडळ आपलं अधिकृत प्रतिनिधी मंडळ नाही’ असं नवी दिल्ली स्थित युरोपीय संघाच्या शाखेकडून स्पष्ट करण्यात आलेय. या प्रतिनिधी मंडळात यूके, फ्रान्स, इटली, पोलंड, जर्मनी या देशांचे सदस्य आहेत. त्यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचीही भेट घेतली.