आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील पाठपुराव्याला यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सुरक्षिततेवर कळंबोली येथील भाजपच्या पदाधिकार्यांनी बोट ठेवले होते. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांकडून पाठपुरावा केला होता. त्यानुसार महामार्गावरील खड्डे त्याचबरोबर इतर त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. आता या ठिकाणी वाहनचालकांना त्यांच्या वेगाची आठवण करून देण्यासाठी डिजिटल स्पीडो मीटर बसविण्यात आले आहेत. कामशेत बोगद्यालगत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे अपघात टळतील, असा विश्वास रस्ते विकास महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
देशातील हा सर्वांत पहिला नियंत्रित महामार्ग आहे. 2002 साली युती शासनाच्या काळात तो बांधण्यात आला. 94.5 किमी लांबीच्या या महामार्गावर कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नाही. सुसाट वेगाने प्रवास करण्याची सवय भारतवासीयांना झाली आहे. सध्या हा भारतातील सर्वांत वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमुळे मुंबई-पुणे हा 148 किमी लांबीचा प्रवास चार-पाच तासांवरून दोन तासांवर आला आहे. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खासगी वाहने, एसटी बसेस, खासगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्स्प्रेस वेचा वापर करतात. सुरक्षित प्रवासासाठी बनवलेल्या या महामार्गावर कळंबोलीपासून पुण्यापर्यंत बर्याच प्रमाणात खड्डे होते. टोलची जेवढी रक्कम स्वीकारली जात आहे त्या तुलनेत प्रवाशांची सुरक्षितता काय, असा सवाल भाजपचे कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील आणि शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी केला होता. रणवरे यांनी यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार लागलीच महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकार्यांनी दाखवलेल्या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकण्यात आली आहेत. त्यांच्या मागणीनुसार रस्ते विकास महामंडळाकडून येथे हायवे मॅनेजमेंट सिस्टीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्पीडो मीटर बसविण्यात आले आहेत.